पुलवामा हल्लाबाबत सत्यपाल मलिकांनी केलेल्या गौप्यस्फोटाची शहानिशा करणे गरजेचे - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:45 PM2023-04-15T16:45:06+5:302023-04-15T16:45:49+5:30
सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्याची शहानिशा होणे गरजेचे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
नाशिक : मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडला आहे. पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्याची शहानिशा होणे गरजेचे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक हे देखील भाजपचे होते. त्यामुळे त्यांना देखील बरेचसे माहिती असेल. सत्यपाल मलिकांनी जी माहिती दिली आहे, त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कोणती तपास यंत्रणा तपास करीत असेल, त्यांनी त्या पद्धतीने हा तपास करायला पाहिजे, असेही छगन भुजबळ म्हणाले.
याचबरोबर, आजपासून दोन दिवस अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून ते महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर पक्ष बांधणीचे काम करणार आहेत. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, नक्कीच मुंबई महानगरपालिका सर्वात मोठी महानगरपालिका असून देशाचे ही महानगरपालिका नाक आहे. त्यामुळे प्रत्येकालाच साहजिकच वाटते की, ही महानगरपालिका आपल्या ताब्यात राहावी. महानगरपालिकेचा महापौर आपल्या पक्षाचा असल्या पाहिजेच त्यासाठी हे सगळेजण सध्या मोर्चे बांधणी करत आहेत.
"पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण.." - सत्यपाल मलिक
पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. "सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. कसेही करून दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती", असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. तसेच पुलवामा हल्ला झाला, त्या दिवशी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादाबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आत्ता शांत राहा, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.