मुंबई पोलिसाची साताऱ्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:10 AM2018-06-25T04:10:56+5:302018-06-25T04:10:58+5:30
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या स्वाती लखन निंबाळकर (३०) यांनी शनिवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. कोंडवे (ता. सातारा) या त्यांच्या गावी ही घटना घडली. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.
सातारा : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या स्वाती लखन निंबाळकर (३०) यांनी शनिवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. कोंडवे (ता. सातारा) या त्यांच्या गावी ही घटना घडली. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.
मृत स्वाती यांचे पती लखन सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यांना एक अकरा महिन्यांचा मुलगा आहे. पती लखन यांना सुटी असल्यामुळे स्वाती चार दिवस सुटी घेऊन सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. शनिवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर त्यांनी विषप्राशन केले.
हे निदर्शनास आल्यानंतर त्यांना लखन यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ‘टेन्शनमुळे मी विष प्यायले असून, याला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा जबाब स्वाती यांनी पोलिसांकडे दिला. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, स्वाती यांच्या आत्महत्येला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.