सतीशच्या हत्येसाठी मंतरलेला सुरा!

By admin | Published: September 14, 2016 04:28 AM2016-09-14T04:28:12+5:302016-09-14T04:28:12+5:30

डोंबिवलीतील व्यावसायिक सतीश रसाळ याच्या हत्येसाठी वापरलेला सुरा मंतरलेला होता असे तपासात पुढे आले. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने मुख्य मारेकऱ्यांसह त्या मांत्रिकालाही अटक केली.

Satyash murder case | सतीशच्या हत्येसाठी मंतरलेला सुरा!

सतीशच्या हत्येसाठी मंतरलेला सुरा!

Next

ठाणे : डोंबिवलीतील व्यावसायिक सतीश रसाळ याच्या हत्येसाठी वापरलेला सुरा मंतरलेला होता असे तपासात पुढे आले. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने मुख्य मारेकऱ्यांसह त्या मांत्रिकालाही अटक केली. हा मांत्रिक पनवेलमधील मौजे वळवली गावचा माजी पोलीस पाटील आहे. दरम्यान, अटकेतील त्रिकुटाला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असे ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
परशुराम नारायण पाटील (७५) असे मांत्रिकाचे नाव आहे. त्याच्यासह जयदीप रसाळ आणि चंदन गायकवाड अशी प्रमुख मारेकऱ्यांची नावे आहेत. जयदीपची पत्नी मे महिन्यापासून त्याला सोडून निघून गेली होती. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार २१ मे रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होती. याचदरम्यान जयदीपला सतीशचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची कु णकूण कानावर आली. तसेच सतीश हा ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान तिच्यासोबत वसईत असल्याचे समजले. त्यामुळे संतापलेल्या जपदीपने मित्र चंदनच्या मदतीने सतीशचा काटा काढण्याचा निर्धार केला. याचदरम्यान जयदीपने त्याचा मानलेला मामा (मांत्रिक) परशुरामची घरी जाऊन भेट घेतली. तेथेच हत्येचा कट रचला. जयदीपने मामाकडून सुरा मंतरुन घेतला.
आठ सप्टेंबरला जयदीप आणि चंदन यांनी सतीषवर पाळत ठेवली. यासाठी दोघांनी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करुन पाठलाग केला. त्याच दिवशी रात्री जवळपास अकराच्या सुमारास जयदीपने मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याचा बहाणा केला. तेथून घरी चाललेल्या सतीश याने भाऊ रस्त्यात काय करतोय म्हणून विचारणा केली. त्यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल घेतले. याचवेळी दोघांनी मद्यप्राशन केले. गाडी थांबवण्याचा आग्रह जयदीपने केल्याने ते सोनारपाडा येथे थांबले. त्यावेळी चंदन हा त्यांच्या मागेच दुसऱ्या गाडीमध्ये होता.
यावेळी सतीश गाडीच्या काचेवरील धुक्याने पडलेले दव आतून पुसत असताना तो बेसावध असल्याने पाहून जयदीपने त्याच्या डोके व मानेवर सुऱ्याने वार केले. त्यानंतर तेथे आलेल्या चंदनने सतीशचा गळा चिरून त्यास ठार मारले. जबरी चोरी झाल्याच्या बनावासाठी सतीशच्या अंगावरील दागिने, घड्याळ, मोबाईल व इत्यादी वस्तू घेऊन त्यांनी पोबारा केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांना धागेदोरे सापडणार नाही याची काळजी घेतली होती. पण जयदीपच्या पत्नीची बेपत्ता तक्रार, तसेच रसाळ कुटुंबीयांनी विकलेल्या जमिनीतून मिळणारे कोट्यावधी रुपये यादृष्टीने मानपाडा आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला. जयदीप याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून सतीशची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यावर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर आणि मानवी अनैतिक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या पथकाने सोमवारी तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासह शस्त्र, मोटारसायकल, कार असा ७ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला अशी माहिती मणेरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
संबंधित वृत्त/२

Web Title: Satyash murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.