सटवाई मंदिरात राहणाऱ्या त्या दाम्पत्याच्या मदतीला सरसावले हात
By Admin | Published: August 24, 2016 07:00 PM2016-08-24T19:00:15+5:302016-08-24T19:00:15+5:30
लाने दुर्लक्ष केल्याने अगदी रस्त्यावर आलेल्या धारूर येथील त्या दाम्पत्याची होणारी ससेहोलपट लोकमत आणि आॅनलाईन लोकमतवर प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले
आॅनलाईन लोकमत इम्पॅक्ट
बीड, दि. 24 - मुलाने दुर्लक्ष केल्याने अगदी रस्त्यावर आलेल्या धारूर येथील त्या दाम्पत्याची होणारी ससेहोलपट लोकमत आणि आॅनलाईन लोकमतवर प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले असून कोणी आर्थिक स्वरूपात तर कोणी वस्तूंच्या स्वरूपात मदत करू लागले आहे.
राज्य परिवहन महामंडळात काम करून सेवानिवृत्त झालेल्या सुरेश भोसले यांनी मुलाने त्यांना वाऱ्यावर सोडल्याने या दाम्पत्याला रस्त्यावर यावे लागले होते. नाईलाजाने भोसले यांनी आपल्या पत्नीसह आपला निवारा म्हणून शहरातील सटवाई मंदिराचा आसरा घेतला. यासंदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर बुधवारी दिवसभर शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी या दोघांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आणि मदतही केली.
नगरसेवक माधवराव निर्मळ यांनी पाच हजार रूपये त्यांना देऊन आणखी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. स्व. हेमंत राजमाने सेवा भावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रविकिरण देशमुख यांनी दीड हजार रूपयांची मदत केली. धारूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने गहु, ज्वारी, तांदुळ आणि साखर या दोघांना देण्यात आली. मुलाने दुर्लक्ष केले परंतु शहरातील नागरिक मुलासारखे मदतीला धावून येत असल्याचे भोसले म्हणाले.