‘सैराट’चा बोभाटा पोलीस ठाण्यात
By Admin | Published: September 21, 2016 05:17 AM2016-09-21T05:17:18+5:302016-09-21T05:17:18+5:30
सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील कथा ‘बोभाटा’ या कादंबरीतून चोरली असल्याचा दावा कादंबरीकार नवनाथ माने यांनी केला
कळंबोली : सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील कथा ‘बोभाटा’ या कादंबरीतून चोरली असल्याचा दावा कादंबरीकार नवनाथ माने यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी पनवेल न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांनी याबाबत कामोठे पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीकरिता मंगळवारी ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे कामोठे पोलीस ठाण्यात हजर झाले.याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
नवनाथ माने यांनी पनवेल न्यायालयात याबाबत वैयक्तिक दावा दाखल केला. २०१० साली माने यांनी ही कादंबरी लिहिली होती. त्यामध्ये जातीच्या भिंती, प्रेमाची कथा यातून निर्माण होणारा संघर्ष मांडला आहे. थोडाफार बदल करून नागराज मंजुळे यांनी याच कादंबरीतून कथा घेऊन ‘सैराट’चित्रपट काढला असे माने यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि निखील सोनी प्रॉडक्शन हाऊसची मंगळवारी चौकशी करण्यात आली. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजपर्यंत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. आणखी गरज पडली तर त्यांना पुन्हा बोलाविण्यात येईल. न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबाबत सविस्तर माहिती देता येत नाही. आम्ही ३० सप्टेंबरला न्यायालयात अहवाल सादर करणार आहोत.
- अशोक नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे