सावरगावाची दिवाळी स्वदेशी वस्तुंनीच होणार साजरी
By admin | Published: October 7, 2016 07:13 PM2016-10-07T19:13:41+5:302016-10-07T19:13:41+5:30
यंदाच्या दिवाळीत खरेदी करावयाच्या सर्व वस्तु या देशी बनावटीच्याच खरेदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
चिखली (बुलडाणा), दि. 07 - उरी हल्ल्यानंतर समस्त भारतीयांकडून पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानची पाठराखण करीत चीनने भारताचे पाणी अडवल्याने चायनिज वस्तुंवर बहिष्कार टाकून चिनला धडा शिकविण्याचा सूर सोशल मिडीयावर उमटला असताना त्यास प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तालुक्यातील सावरगाव डुकरे या गावाने याबाबत ग्रामसभा घेवून चीनसह इतर विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
विशेषत: यंदाच्या दिवाळीत खरेदी करावयाच्या सर्व वस्तु या देशी बनावटीच्याच खरेदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. भारताचा कट्टर शत्रू असलेल्या व दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानला चीन मदत करत आहे, त्यामुळे चीनच्या सामानावर बहिष्कार टाकण गरजेच आहे.
विशेषत: दिवाळीमध्ये खरेदी केल्या जाणा-या सामानांमध्ये ५० टक्के सामान तसेच फटाके देखील चिनी बनावटीचे असते. त्यामुळे या वस्तुंवर बहिष्कार टाकून चिनला अद्दल घडवा, असे आवाहन सोशल मिडीयावर करण्यात आले होते.या
आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्यक्ष कृतीतून चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासाठी तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील ग्रामस्थ सरसावले असून २ आॅक्टोबर रोजी सरपंच राजीव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व तेजराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत रंजीत जाधव यांनी चायनिज व विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव मांडला असता शिवानंद पाटील यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्व सदस्य व ग्रामस्थांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थांनी चीन व विदेशी उत्पादने खरेदी करू नये, तसेच ज्या वस्तुंवर मेड इन पी.आर.सी. (पिपल्स रिपब्लीक आॅफ चायना) असे लिहलेले असेल अशी वस्तु खरेदी करू नये व वापरू नये. विशेषत: यंदाच्या दिवाळीत पणती, मेनबत्ती, आकाश दिवे, टॉर्च,
लाईटींग, ईलेक्ट्रॉनिक उपकरणे व इतर वस्तु या देशी बनावटीच्याच खरेदी कराव्यात व स्वदेशी वस्तुपेक्षा कितीही स्वस्तात चिनी वस्तु मिळाल्यातरी त्याचा बहिष्कार करून पाकिस्तानला साथ देणा-या चिनला धडा शिकविण्यासाठी हा ठराव घेण्यात आला आहे. सोबतच पाकिस्तानला मदत करणा-या चीनची अर्थव्यवस्था ढासळवण्यासाठी देशवासियांना चीननिर्मित वस्तू खरेदी करू नये असे आवाहन देखील सावरगाव डुकरे वासीयांनी केले आहे.