स्वातंत्र्योत्तर काळातही सावरकरांची उपेक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 04:13 AM2017-05-29T04:13:24+5:302017-05-29T04:13:24+5:30
अंदमानच्या कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची पट्टी व काव्यपंक्ती काढणारे तत्कालीन मंत्रीच खरे देशद्रोही असून, काळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अंदमानच्या कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची पट्टी व काव्यपंक्ती काढणारे तत्कालीन मंत्रीच खरे देशद्रोही असून, काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांची एसी गाड्यांमध्ये फिरून अवहेलना करणाऱ्यांनी कि मान दहा-बारा दिवस तरी अंदमानमध्ये राहून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या टीकाकारांना दिले. सावरकरांनी हालअपेष्टा भोगल्या, स्वांतत्र्योत्तर काळातही त्यांची उपेक्षाच झाली, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, देशातील याआधीच्या राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी काळ््या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांची केवळ उपेक्षाच केली.
तत्कालीन राज्यकर्त्यांना सावरकर यांच्या प्रतिभेतून आपण झाकाळून जाऊ ही भीती होती, म्हणून त्यांनी त्यांना कधीच मोठे होऊ दिले नाही, असा आरोप काँग्रेसचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्र्यांनी केला.
दत्तक नाशिकचा अपेक्षाभंग
नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा निवडणुकीच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्यासमोर बैठकीत महापालिकेने २,१७३ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, ठोस मदतीचे आश्वासन न देताच, मुख्यमंत्र्यांनी बैठक संपवल्याचे सांगण्यात आले.
स्मृती संग्रहालयाबाबत सकारात्मक
सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भगूर येथे सावरकर स्मृती संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्यास सकारात्मकता दर्शवित संग्रहालयाचे काम हाती घ्या, राज्य सरकारकडून आवश्यक ते पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.