थकबाकीदारांवर नवी मुंबईत ‘संक्रांत’
By admin | Published: January 25, 2017 03:44 AM2017-01-25T03:44:05+5:302017-01-25T03:44:05+5:30
मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ८८०० जणांची यादी तयार
नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ८८०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. ८३० मोठ्या थकबाकीदारांना ४८ तासांची अंतिम नोटीस दिली असून, २३ जणांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता व एलबीटी विभागातील थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कर विभागातील थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची संख्या ८८००पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठविण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या ८३० मोठ्या थकबाकीदारांना कर भरण्यासाठी ४८ तासांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. मंगळवारी यापैकी २३ जणांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी ९४ लाख १७ हजार २७५ रुपये थकबाकी आहे. सर्व थकबाकीदारांनी त्यांची थकीत रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी अशा सूचना दिल्या होत्या. परंतु यानंतरही थकीत रक्कम न भरल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेने यापूर्वी एलबीटी थकविणाऱ्यांच्या मालमत्ता सील केल्या होत्या. पण मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या मालमत्ता सील केलेल्या नव्हत्या. पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
नोटीस दिलेल्या थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा केला नाही, तर संबंधितांवर कारवाई सुरूच ठेवली जाईल, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)