विक्रमगडच्या घरकुल योजनेत सावळागोंधळ
By admin | Published: March 7, 2017 03:01 AM2017-03-07T03:01:27+5:302017-03-07T03:01:27+5:30
नावे आॅनलाईन यादीतून गायब झाल्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत सगळा गोंधळ निर्माण झाला आहे.
विक्रमगड : या तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन हजार लाभार्थींची नावे मंजूर झाली असतांनाही त्यातील अनेक नावे आॅनलाईन यादीतून गायब झाल्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत सगळा गोंधळ निर्माण झाला आहे.
याला गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा दावाही यादीतून नावे गायब झालेल्या लाभार्थींनी केला आहे. लाभार्थ्यांच्या आॅनलाईन यादीचा व अंतिम यादीचा ताळमेळ जुळत नाही अनेकांची नांवे मंजूर यादीमध्ये घेण्यात आली असतांनाही त्यांची नांवे अंतिम आॅनलाईन यामध्ये गायब करण्यात आली आहेत़ तर गरजू लाभार्थी बाजूला सारुन भलत्यांचीच नांवे घुसडविली आहे़त यापैकी आलोंडा येथील रहीवासी कातकरी महिला लाभार्थी मंजुळा रामू धनगरे यांचे घर कुडाचे असतांना शासनाच्या सर्व निकषांमध्ये बसत असतांना त्यांना या योजनेचा लाभ मंजूर झाला होता व त्यांचे नांवही अंतिम यादीमध्ये देखील घेण्यात आले होते परंतु आॅनलाईन वरील अंतिम यादीमधून त्यांचे नांव गायब केले गेले आहे. याबाबत त्यांनी श्रमजीवीकडे आपले गा-हाणे मांडल्यानंतर तुषार सांबरे यांच्या नेतृत्वाखाली महिला ठिणगी कार्यकर्त्याच्या शिष्टमंडळाने गट विकास अधिकारी प्रदिप डोल्हारे यांना घेराव घातला असता त्यांनी त्यांना लाभ दिला जाईल, त्या वंचित राहाणार नाहीत़ असे आश्वासन दिल्याने शिष्टमंडळ परतले़ मात्र जर त्यांना लाभ मिळाला नाही तर त्या पंचायत समिती समोर उपोषणास बसतील असा इशाराही देण्यात आला. ओंदे ग्रामपंचायतीतील लाभार्थी नागेष म-हया भोरे यांच्याबाबत ही हाच प्रकार घडलेला असून त्यांचेही नाव आॅनलाईन अंतिम यादीतून वगळण्यात आहे ़त्यांचे नाव अंतिम यादीत क्र ११७ वर आहे. परंतु आॅनलाईन यादीतून ते वगळले गेले आहे. त्यांनी देखील तक्रार केली. परंतु त्यांना अदयाप कुणीही दाद दिली नाही़
त्याचप्रमाणे अनेकांनी पहिला हप्ता मिळाल्यानंतर उधार उसनवारीने घराचे काम पूर्ण करीत आणले त्यांना दुसरा हप्ता मिळालेला नाही़ त्यांचे संसार उघडयावर पडले आहेत. एकाच कुंटुंबाला तीन वेळा घरकुलांचा लाभ, एकाच घरातील तीनतीन व्यक्तींना घरकुले, अपात्र व्यक्तींना घरकुले असे प्रकारही घडले आहेत. याबाबत गट विकास अधिकारी व त्यांच्या टीमने चौकशी करावी व जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ (वार्ताहर)
>मंजुळा धनगरे हया लाभार्थींचे नाव अनावधानाने आॅनलाईन यादीमध्ये आले नाही. परंतु त्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल त्या घरकुलाच्या लाभापासून वंचित राहाणार नाहीत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत़
-प्रदिप डोल्हारे,
प्रभारी गट विकास अधिकारी विक्रमगड
विक्रमगड तालुक्यात सर्वच योजनांमध्ये मोठया प्रमाणावर सावळा गोेंधळ सुरु असून कुणाचेही कुणाकडे लक्ष नाही. मंजुळा धनगरे या सर्व निकषांमध्ये बसत असतांना व त्यांचे नांव मंजूर यादीमध्ये असतांनाही आॅनलाईन यादीमध्ये गायब होते ही गंभीर बाब आहे़ असेच प्रकार अनेकांच्या बाबत घडलेले आहे़ बोगस लाभार्थीना देखील घरकुलांचा लाभ मिळालेला आहे़ याची चौकशी व्हावी़
-तुषार सांबरे, श्रमजीवी संघटना विक्रमगड