गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 3, 2017 05:58 PM2017-05-03T17:58:35+5:302017-05-03T18:57:07+5:30
दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्यानंतर भारतातून पाकिस्तानबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्यानंतर भारतातून पाकिस्तानबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनीदेखील संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर तोंडसुख घेतलं आहे. भाजपा सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.
भाजपाने पक्ष मजबूत करण्यापेक्षा देश आणि राज्य मजबूत करावं, एका सर्जिकल स्ट्राइकने पाक सुधारणार नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून तुकडे करावेत. मोदींच्या पाठीशी शिवसेना उभी राहील असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. वांद्रे येथील रंगशारदामध्ये लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर टीका करताना फडणवीस सरकार निरूपयोगी असल्याचं म्हणाले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रात निरुप"योगी" सरकार आहे, असं ते म्हणाले. गोहत्येबाबत बोलताना गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवावा असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
मध्यावधी निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आधी स्वत:च्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या थांबवाव्या, मग आम्हाला सत्ता सोडण्याचा उपदेश करावा असं ते म्हणाले. तसेच मध्यावधी निवडणुका आज झाल्या तर आम्ही तयार आहोत असं वक्तव्य त्यांनी केलं.