बेटी बचाओ : मुलीच्या बापाला तीन महिने दाढी-कटिंग ‘फ्री’
By admin | Published: January 27, 2017 08:48 AM2017-01-27T08:48:06+5:302017-01-27T08:48:06+5:30
सिन्नरच्या नारायण संत या सलून व्यावसायिकाने बेटी बचाओ मोहिमेसाठी अफलातून उपक्रम शोधला असून मुलीच्या वडिलांना ३ महिने दाढी-कटिंग फ्रीमध्ये करून देण्यात येईल.
शैलेश कर्पे, ऑनलाइन लोकमत
सिन्नर (नाशिक), दि. २७ - मुलगी झाल्यानंतर अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटतात. मात्र मुलीच्या पित्याच्या आठ्या घालविण्यासाठी सिन्नरच्या नारायण संत या सलून व्यावसायिकाने एक अफलातून उपक्रम हाती घेतला आहे. मुलगी झालेल्या बापाला फ्री बॉडी मसाजसह त्यांच्या दुकानातून तीन महिने दाढी-कटिंग निशुल्क करुन दिली जाणार आहे.
येथील चौदा चौक वाड्यात नारायण संत यांचे नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये संत जेन्टस् पार्लर म्हणून सलूनचे दूकान आहे. नारायण संत समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अनेक समजोपयोगी उपक्रम राबविण्यात ते नेहमीच पुढे असतात. संत यांनी ‘बेटी बचाव’ या उपक्रमास पाठींबा देण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक उपक्रम हाती घेतला आहे. प्रजासत्ताक दिनापासून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. शहरात २६ जानेवारीपासून मुलगी झालेल्या पित्याची संत यांच्या दूकानातून तीन महिन्यांसाठी दाढी -कटिंग फ्री करुन दिली जाणार आहे. याशिवाय एक वेळाची बॉडी समाज फुकटात केली जाणार आहे. मुलगी वाचली पाहिजे आणि शिकली पाहिजे या उपक्रमाला पाठींबा देण्यासाठी सदर उपक्रम हाती घेतला असल्याचे संत यांनी सांगितले.
अर्धांगवायू झालेल्या नागरिकाला ५० टक्के सवलत
नारायण संत यांनी बेटी बचाव साठी जसा पुढाकार घेतला आहे. तसाच उपक्रम अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी स्विकारला आहे. ज्या व्यक्तीला अर्धांगवायूचा त्रास झाला असेल अशा व्यक्तींना सहकार्य करण्यासाठी संत यांनी ५० टक्के दरातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.