आरेचे जंगल वाचवण्यासाठी 'आप' आक्रमक
By admin | Published: February 17, 2017 05:02 PM2017-02-17T17:02:26+5:302017-02-17T17:02:26+5:30
मुंबईचे हरित फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरेचे जंगल वाचवण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने (आप) केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईचे हरित फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरेचे जंगल वाचवण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने (आप) केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आप नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी सर्व राजकीय पक्षांनी आरेबाबत त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले. यावेळी अभिनेता रघु राम, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि आरे वाचवा मोहिमेतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मेनन म्हणाल्या की, २०१४ साली मुख्यमंत्र्यांनी आरे वाचवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता यु टर्न घेत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो शेड प्रकल्प पुढे रेटण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकल्पाला स्थगिती दिलेली आहे. तरीही सरकारी बाबुंना हाताशी घेऊन मुख्यमंत्री जंगल नष्ट करून उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरे जंगल वाचवण्यासाठी सेव्ह आरे कँम्पेन अंतर्गत सोशल मीडियावर चळवळ सुरू केली आहे. २ दिवसांत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना चळवळीतील कार्यकर्ते भेटणार आहे.
शिवाय आरेमध्ये जंगल हवे की कारशेड यावर भुमिका जाहीर करण्याचे आवाहन करणार आहेत. शिवाय ज्यांना कारशेड हवे असेल, त्यांच्याविरोधात मतदान करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले जाईल.
मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे का?
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवत आरेमध्ये कारशेड तयार करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आणखी एक संधी देत असल्याचे मेनन म्हणाल्या. आरेमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही, याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देण्साची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.