रेल्वेतून पडणाऱ्या पतीला वाचविताना पत्नीचाही गेला तोल, हिंगोलीच्या पती-पत्नीचा करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 02:10 PM2018-03-04T14:10:51+5:302018-03-04T14:12:25+5:30
अकोला येथे नातेवाईकांकडे इंटरसिटी एक्सप्रेसने लग्नासाठी जात होते. यावेळी उज्वला यांना लघूशंकेसाठी जायचे होते. तेव्हा हे दोघेही रेल्वेतील स्वच्छतागृहा जवळ आले...
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील पती-पत्नीचा अकोल्यापासून काही अंतरावर असलेल्या शिवणी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना २ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली.
नामदेव वामन दांडेकर (४४, व उज्वला नामदेव दांडेकर (४०) (दोघेही राहणार खरवड) असे मयताचे नावे आहेत. हे दोघे 2 मार्च रोजी हिंगोली स्टेशन येथून अकोला येथे नातेवाईकांकडे इंटरसिटी एक्सप्रेसने लग्नासाठी जात होते. यावेळी उज्वला यांना लघूशंकेसाठी जायचे होते. तेव्हा हे दोघेही रेल्वेतील स्वच्छतागृहा जवळ आले. तेथे थांबले असता सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान शिवणी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे आली असता अचानक नामदेव यांचा गाडीतून तोल गेला. हे उज्वला यांच्या लक्षात येताच त्यांनी नामदेव यांना वाचविण्यासाठी धाव घेतली मात्र त्यांचाही तोल गेल्याने दोघेही धावत्या रेल्वेतून खाली पडले. हे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड करून रेल्वे थांबविली. मात्र तोपर्यंत नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला होता तर उज्वला या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना लागलीच अकोला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचाही सायंकाळी ७ वाजता मृत्यू झाला.
ही बातमी खरवड येथील त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता खरवड येथे आणण्यात आले. येथील स्मशानभूमीत दोघांनाही एकाच चित्तेवर रात्री ८ वाजेच्या दरम्यान मुखाग्नी देण्यात आला. दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. दांडेकर यांना ३ मुले आहेत.
मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले-
तीन मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होती. अंत्यविधीला आ.डॉ. संतोष टारफे, केशव नाईक, बबन ढाले, सुधाकर पाईकराव, प्रकाश कवाणे, संजय मस्के आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.