जीव वाचवायचा की, पतंग... एकदाचा निर्णय घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 08:44 IST2025-01-12T08:44:14+5:302025-01-12T08:44:21+5:30
नायलॉन मांजा निसर्गात कुजत नाही व लवकर नष्टदेखील होत नाही. यामुळे नायलॉन मांजा झाडांवर पडून राहतो आणि त्यामुळे जैवविविधतेची मोठी हानी होते...

जीव वाचवायचा की, पतंग... एकदाचा निर्णय घ्या!
- संदीप कर्णिक
पोलिस आयुक्त, नाशिक शहर
मकर संक्रांतीचा सण इंग्रजी नूतन वर्षाचा प्रारंभी येणारा पहिला सण आहे. या सणाला आपल्या संस्कृतीनुसार सूर्यदेवतेची पूजा केली जाते. या सणाच्या दिवशी आपण प्रत्येक जण एकमेकांना तिळगूळ देतो अन् गोड बोला अशी विनंतीही करतो. मग या सणाचा गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करूया आणि नायलॉन मांजावर कायमचा बहिष्कार टाकूया. पतंगबाजीचा आनंद मोकळ्या मैदानात सुरक्षितरीत्या जरूर लुटावा; मात्र हा आनंद इतरांसाठी दु:खदायक ठरणार नाही, याची खबरदारी घेणे प्रत्येक सुजाण, संवेदनशील नागरिकाचे कर्तव्य आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत नायलॉन मांजा, चायनीज मांजा, काचेचा चुरा लावलेल्या दोऱ्याची विक्री, वापर आणि साठेबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे मनाई आदेशदेखील काढण्यात आले आहेत. केवळ लेखी आदेश नाही, तर कठोर कारवाईच्या सूचनाही पोलिसांना करण्यात आल्या आहेत. यानुसार नाशिक शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिस आयुक्तालयांतर्गत आतापर्यंत नायलॉन मांजा बाळगताना आढळून आलेल्या व्यक्तींविरुद्ध वर्ष २०२४ मध्ये एकूण ३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये ३९ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून १,५३६ नायलॉन मांजाचे मोठे रील जप्त करण्यात आले आहे. एकूण ११ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत नाशिक पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच यापूर्वी दाखल असलेल्या अभिलेखावरील गुन्ह्यांची माहिती तपासून नायलॉन मांजा विक्रीमध्ये सराईत असलेल्या ७४ विक्रेत्यांना पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १ ते १६ जानेवारीपर्यंत तडीपार करण्यात आले आहे. हद्दपारीची ही प्रक्रिया सुरूच आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह खरेदी करणाऱ्यांवरसुद्धा प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत साध्या वेशातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी ‘वॉच’ ठेवून आहेत. अशा व्यक्तींवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. हद्दपारीचे आदेश पारित झाल्यानंतरसुद्धा शहरात वावरताना आढळून येणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याचेही आदेश गुन्हे शाखांचे सर्व युनिट व गुंडाविरोधी पथकांनाही देण्यात आले आहे.
नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी जखमी झाल्यास त्यांची जबाबावरून फिर्याद नोंदवून अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम-११० अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ज्या दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहे. अंबड पोलिस ठाण्यात या प्रकारचा पहिला गुन्हा एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी नायलॉन मांजा वापराचा अट्टहास करता कामा नये. नायलॉन मांजा हा जसा मनुष्यासाठी घातक आहे, तसा तो पक्षी आणि पर्यावरणासाठीही धोकादायक आहे. नायलॉन मांजा निसर्गात कुजत नाही व लवकर नष्टदेखील होत नाही. यामुळे नायलॉन मांजा झाडांवर पडून राहतो आणि त्यामध्ये पक्षी अडकून जायबंदी होण्याच्या घटना संक्रांतीनंतरही सुरूच असतात. यामुळे जैवविविधतेची मोठी हानी होते. यामुळे नायलॉन मांजाची मागणी नागरिकांनी कोठेही करता कामा नये. जर मागणी केलीच नाही, तर विक्रीदेखील आपोआपच थांबण्यास मदत होईल, यात शंका नाही.
- शब्दांकन : अझहर शेख,
वरिष्ठ उपसंपादक, नाशिक आवृत्ती.