भारतीय खाद्यसंस्कृतीचे मोबाईलच्या माध्यमातून जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 01:12 AM2017-05-16T01:12:19+5:302017-05-16T01:18:43+5:30

‘सणोत्सव व पाककृती’ : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी तयार केले बहुमोल माहितीपूर्ण ‘अ‍ॅप’

Saved through the Indian Food Store | भारतीय खाद्यसंस्कृतीचे मोबाईलच्या माध्यमातून जतन

भारतीय खाद्यसंस्कृतीचे मोबाईलच्या माध्यमातून जतन

Next

प्रदीप शिंदे ।  -लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारतीय खाद्यसंस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. ऋतंूतील वातावरणाच्या बदलांनुसार शरीरातील पचन व पोषण क्षमता कमी-अधिक होत असते, त्यानुसार आपल्याकडील आहारात बदल केला जातो. मात्र, आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण त्यापासून दूर जात आहे. नव्या पिढीला आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या याच गोष्टींची माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी ‘भारतीय सणोत्सव व पाककृती’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.
आपल्याकडे प्रामुख्याने उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशी ऋतूंमध्ये विभागणी होते. ऋतू बदलांप्रमाणे आपल्या शरीरातही बदल होत जातो. शरीर आणि वातावरणातील बदलानुसार आपण आपल्या आहार-विहारातही बदल केला तरच शरीर तंदुरुस्त राहते. एकाच प्रकारचा आहार-विहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही. त्यासाठी आहारात बदल करणे आरोग्यदृष्ट्या आवश्यकच असते. भारतीय परंपरेत त्यासाठी सणांची जोड दिली आहे. ऋतूनुसार आहार-विहारात बदल न केल्यास काही व्याधी निर्माण होऊ शकतात.बदलत्या जीवनशैलीमुळे नव्या पिढीला सण, उत्सव, हवामान बदलानुसार खाण्यातील पदार्थांचे महत्त्व लक्षात येत नाही. या गोष्टी नव्या पिढीला माहिती व्हाव्यात याच उद्देशाने शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील एम.एस्सी भाग -१ मधील विद्यार्थिनींनी ‘भारतीय सणोत्सव व पाककृती’ हे अ‍ॅप तयार केले आहे. त्यात प्रत्येक सणांची माहिती मिळणार आहे.


असे आॅपरेट होते अ‍ॅप...
‘गुगल प्ले स्टोअर’मधून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करत येणार आहे. अ‍ॅपद्वारे मोबाईलवर प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर येईल. प्रत्येक सणांची माहिती तारखेप्रमाणे येणार आहे. त्या तारखेवर क्लिक केल्यानंतर त्या सणांची माहिती व कोणते पदार्थ खातात यांची माहिती मिळेल. यासह तो पदार्थ कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती दिली आहे. ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी सकाळी नऊ वाजता आपल्या अ‍ॅपवर नोटिफिकेशन येते. यासह अ‍ॅपवर सर्च आॅप्शन आहे. त्याचाही वापर करता येणार आहे.


यांची कल्पना...
ऐश्वर्या अजित राऊत, किरण प्रकाश पोतदार, अक्षता अरविंद देशपांडे या विद्यार्थिनींनी हे अ‍ॅप तयार केले आहे. त्यासाठी त्यांना साधारणपणे पाच महिने लागले आहेत. कमी खर्चामध्ये हे मोबाईल अ‍ॅप या विद्यार्थिनींनी तयार केले आहे. त्यासाठी यांना डॉ. यू. आर. पोळ, डॉ. आर. आर. मुधोळकर, प्रा. प्रसन्न करमरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हवामान बदलानुसार आहार घेणे गरजेचे आहे हीच माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने आम्ही हे अ‍ॅप तयार केले आहे, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या, किरण आणि अक्षता या विद्यार्थिनींनी व्यक्त केली.


आपली संस्कृती, आहार यांची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. यावर प्रत्येक सणांची, खाद्यपदार्थांची माहिती व तयार करण्याची पद्धत दिली आहे. लवकच हे अ‍ॅप्लिकेशन ‘प्ले स्टोअर’वरून अपलोड करता येणार आहे.
-प्रा. प्रसन्न करमरकर

Web Title: Saved through the Indian Food Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.