शाब्बास!... वय वर्षं 8, इयत्ता तिसरी; बक्षिसांमधून जमवलेली सगळी रक्कम कोरोनाविरोधी लढाईसाठी दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:44 AM2020-04-08T10:44:15+5:302020-04-08T10:44:45+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीनासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, मुंबई, पुण्यासह काही शहरांमधीलरुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. धारावी झोपडपट्टी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ठाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीनासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनाला मान देत एक लहानग्या मुलाने बक्षिसाच्या रुपात मिळवलेली सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत होत आहे. यामध्ये विशेष म्हणजे अवघ्या आठ वर्षाच्या मुलाने बक्षिसापोटी मिळालेले १० हजार रुपये मुख्यमंत्री निधीस दिले आहे. या लहानशा ओंजळीने मोठी मदत केल्याने सर्व स्तरावरुन त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
रेल्वेत मजुरी करणाऱ्या कुटुंबातील 'संविधान दीपक गडसिंग' असे या चिमुकल्याचे नाव आहे. संविधान सध्या इयत्ता तिसरीमध्ये शिकतो आहे. काही दिवसांपूर्वी चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक झाले होते. अनेकांनी त्याचा सत्कार केला होता. त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने कोरोनाविरोधी लढाईसाठी दिले आहे. संविधानने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे रकमेचा धनादेश दिला. संविधानच्या मदतीने धनंजय मुंडे देखील भारावून गेले. तुझ्या नावातच सर्वकाही आहे संविधान असं म्हणत धनजंय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहे.
संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड परळी रेल्वेमार्गावर मजुरी करतात. घरची परिस्थिती तशी नाजूकच. तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्या जोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.