वीस दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत
By admin | Published: May 12, 2016 04:22 AM2016-05-12T04:22:46+5:302016-05-12T04:22:46+5:30
दुष्काळाच्या स्थितीत सांडपाण्याच्या पुनर्वापरातून गेल्या २० दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत ‘क्रिडाई कोल्हापूर’ने केली आहे.
मुंबई : दुष्काळाच्या स्थितीत सांडपाण्याच्या पुनर्वापरातून गेल्या २० दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत ‘क्रिडाई कोल्हापूर’ने केली आहे. या पाण्याद्वारे बांधकाम व्यावसायिकांनी शहरातील ५० किलोमीटरवरील झाडांना जीवदान दिले आहे.
टंचाईच्या परिस्थितीत रस्त्यांवरील झाडांना पाणी पुरविणे अशक्य झाले असताना त्यावर बांधकाम व्यावसायिकांची संघटना असणाऱ्या ‘क्रिडाई कोल्हापूर’ने पुढाकार घेतला. या संघटनेने शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या ५० किलोमीटरच्या रस्त्यांवरील झाडांना पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात वीस दिवसांपूर्वी केली. यासाठी कसबा बावडा येथील महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर केला जातो. शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे संबंधित झाडांना देण्यात येते. रोज टँकरच्या सात फेऱ्यांद्वारे ८० हजार लिटर पाणी या झाडांना सोमवार ते रविवारपर्यंत पुरविण्यात येते. रोज एका रस्त्यावरील झाडांना पाणी दिले जाते. या उपक्रमातून आतापर्यंत १ कोटी ६० हजार लिटर पाणी झाडांना दिले आहे. यामुळे पिण्याच्या, वापरासाठी असलेल्या शुद्ध पाण्याची बचत झाली आहे.
निम्म्या खर्चात झाडांना जीवदान
आम्ही रस्त्यांवरील झाडांना वर्षभर पाणी देणार आहोत. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात असल्याने एक कोटी ६० हजार लिटर इतक्या शुद्ध पाण्याची बचत झाली असल्याचे ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले. शहरातील अन्य जलस्रोतांतील पाणी या झाडांना दिले असते तर महिनाकाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाले असते. यामुळे हा खर्च निम्म्यावर आला, असेही यादव यांनी सांगितले.जळगावमध्ये डॉक्टरांचा पाणीबचतीचा निर्धार
जलमित्र अभियानात जळगावमधील डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये पाणी बचत करण्याचा निर्र्धार केला. या अभियानात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ.नीलेश चांडक, डॉ.अजितकुमार, डॉ. ज्योती गाजरे, डॉ.गुणवंत महाजन, डॉ.महेंद्र काबरा सहभागी झाले आहेत.