प्रसंगावधान राखत आई-बहिणीचे वाचवले प्राण; शिवांगी काळे हिला मिळाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:40 PM2022-01-24T16:40:39+5:302022-01-24T16:41:25+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रशांत भदाणे
जळगाव - आईला विजेचा शॉक लागल्यानंतर प्रसंगावधान राखत आईसह लहान बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या जळगावातील शिवांगी प्रसाद काळे या ६ वर्षीय चिमुकलीला या वर्षीचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार जाहीर झाला आहे. वीरता श्रेणीतून तिची या पुरस्कारासाठी निवड झालीये. शिवांगीच्या धाडसाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्यानं जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. कोरोनाच्या निर्बंधांमुळं शिवांगीला हा पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊतांच्या हस्ते ऑनलाईन प्रदान करण्यात आला. यावेळी तिचे आई-वडिल, लहान बहिण उपस्थित होते.
काय होती नेमकी घटना?
शिवांगीचं कुटुंब हे जळगाव शहरातील कोल्हेनगरात वास्तव्याला आहे. तिचे वडील प्रसाद काळे हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. आई गुलबक्षी या गृहिणी आहेत. गेल्या वर्षी ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता घरात आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गुलबक्षी यांनी बादलीत विजेचे हिटर लावले होते. त्यावेळी शिवांगी आणि तिची लहान बहिण इशान्वी या घराबाहेर खेळत होत्या. विजेचा प्रवाह सुरू असताना नजरचुकीने गुलबक्षी यांनी पाणी तापले किंवा नाही, हे पाहण्यासाठी बादलीत हात टाकला. तेव्हा त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्या जोरात किंचाळल्या. हा आवाज ऐकून शिवांगी घरात पळत आली. तिच्या मागे इशान्वी पण आली. तेव्हा शिवांगीने प्रसंगावधान राखत इशान्वीला दूर केलं. त्यानंतर प्लास्टिकचा स्टूल आणून तात्काळ बटण बंद करून हिटरचा विजेचा प्रवाह बंद केला. त्यामुळं गुलबक्षी यांचा जीव वाचला होता. शिवांगीच्या याच धाडसाची आज देशपातळीवर दखल घेतली गेलीये.
आई-वडिलांना कन्येचा अभिमान
शिवांगीची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झाल्याने तिच्या आई-वडिलांना खूप आनंद झालाय. एवढ्या लहान वयात तिला हा बहुमान मिळणं निश्चितच आमच्यासाठीही मोठी गोष्ट आहे. शिवांगीनं त्यावेळी प्रसंगावधान राखलं नसतं तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया गुलबक्षी काळेंनी बोलताना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.