‘सावित्री’ दुर्घटनेत विरारमधील काटकर यांचा अंत
By admin | Published: August 6, 2016 02:50 AM2016-08-06T02:50:33+5:302016-08-06T02:50:33+5:30
गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.
विरार : गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी विरार येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
विरार पश्चिमेकडील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या काटकर यांनी सिटी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवा सुरु केली होती. लांजा येथे गणपती असल्याने त्याच्या तयारीसाठी चार दिवसांपूर्वी काटकर गावी गेले होते. घरची साफसफाई आणि गणपतीची पूर्वतयारी करून कातकर राजापूर-बोरीवली बसने विरार येथील घरी यायला निघाले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी घरी फोनही केला होता. सकाळी बोरीवलीला उतरल्यानंतर फोन करतो, असे त्यांच्या पत्नीशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. दुसऱ्या दिवशी बातमीनंतर घरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)
>काटकर परत येतील असा घरच्यांना विश्वास वाटत होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळी काटकर यांचा मृतदेह आंबेत-म्हसळा नदीकिनारी हाती लागल्यानंतर कुटुंबिय शोकात बुडाले.
पहाटे त्यांचा मृतदेह विरारला आणल्यानंतर सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकात बुडालेल्या कुटुंबियांनी मीडियाशी बोलण्याचा नकार दिला.