बिरवडीत साकारला सावित्री दुर्घटना देखावा
By admin | Published: September 9, 2016 03:13 AM2016-09-09T03:13:14+5:302016-09-09T03:13:14+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी जुनी बाजारपेठे येथील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत, ब्रिटिशकालीन सावित्री पूल दुर्घटनेचा देखावा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे
दीपक साळुंखे , बिरवाडी
महाड तालुक्यातील बिरवाडी जुनी बाजारपेठे येथील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत, ब्रिटिशकालीन सावित्री पूल दुर्घटनेचा देखावा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन हे मंडळ तयार केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गणोशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारा देखावा मंडळाकडून साकारण्यात येतो. या वर्षी मंडळाने सावित्री पूल दुर्घटनेची दाहकता दर्शविणारा देखावा साकारला आहे. २ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास सावित्री नदी पात्रात बुडून ३२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला होता. यामध्ये १४ लोकांचे मृतदेह मिळाले असून, १३ दिवस या ठिकाणी एनडीआरएफ, नौदल, महसूल कर्मचारी, पोलीस यांनी मदतकार्यामध्ये घेतलेला सहभाग. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था यांनी केलेली मदत, तसेच या घटनेप्रसंगी देवदूत म्हणून धावून आलेल्या बसंतुमारे यांच्यासह या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार, खासदार, मंत्री यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे केलेले सांत्वन या सर्व बाबींचा समावेश या देखाव्यामध्ये करण्यात आला आहे.
मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव लांडगे, उपाध्यक्ष अनिकेत भिसे, खजिनदार कल्पेश सागवेकर, सेक्रेटरी नीरज पारेख, अक्षय गांधी हे गणेशोत्सवात वेगवेगळ्या देखावे सादर करून मंडळाचे वेगळेपण कायम जपत आहेत.