पतीला किडनी देऊन ‘त्या’ बनल्या आधुनिक सावित्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:42 PM2019-11-22T12:42:46+5:302019-11-22T12:46:40+5:30
वैरागमध्ये डेंग्यूचा बळी: कुंकवाचा धनी अन् पोटचा गोळाही गेला; नियतीचा अजब खेळ; वैरागमध्ये शोक
धनाजी शिंदे
वैराग : सुखी संसार सुरू होता़ पती शिकवणी घेऊन मुलांना शिकवायचे अन् संसाराचा गाडाही चालावायचे़ पण अचानक त्यांना किडनीचा आजार बळावला़ परिणामी तो आजार बरा व्हावा, म्हणून तब्बल १७ एकर जमीन विकली आणि खर्च भागविला़ पण किडनी मिळेना. अखेर पत्नी नीलावती यांनी स्वत:ची एक किडनी पतीला दिली़ पतीला किडनी देऊन ‘त्या’ आधुनिक सावित्री बनल्या़ मात्र तरीही त्या पतीला वाचवू शकल्या नाहीत़ अखेर कुंकवाचा धनी आणि आता पोटचा गोळाही डेंग्यूच्या आजाराने गेला़ नियतीचा हा अजब खेळ तिच्याच वाट्याला का, अशा भावना व्यक्त करीत वैरागमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
पेशाने शिक्षक असलेले पती सूर्यकांत माने (कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) हे येथील मूळ रहिवाशी होते. ते सातारा, पुणे चिंचवड येथे खासगी शिकवणीचे वर्ग चालवत होते. दरम्यान, त्यांना किडनीचा आजार जडला. त्यामुळे ते वैराग येथे स्थायिक झाले व येथेच शिकवणी वर्ग चालू केले. दरम्यान, आजार बळावत गेला. आजाराच्या खर्चासाठी त्यांनी स्वत: कमावलेली सीनादारफळ (ता. माढा) येथील १७ एकर जमीन विकली आणि खर्च भागवला. परंतु किडनी मिळत नसल्याने शेवटी त्यांची पत्नी नीलावती यांनी आपली एक किडनी देऊन पतीला जीवनदान दिले.
कुंकवाच्या धन्याला वाचवण्यासाठी त्या आधुनिक सावित्री बनल्या. परंतु दोन वर्षांपूर्वी पती सूर्यकांत यांचे निधन झाले. एवढा मोठा आघात सोसून नीलावती सावरल्या. परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. माने कुटुंबावरील उद्भवलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे वैराग व परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
एमपीएससीची अंतिम परीक्षा राहिली
- पतीच्या निधनानंतर नीलावती या स्वत:ला सावरत मोठा मुलगा सूरजला इंजिनिअर बनवले. मुलगी श्रद्धा एमएस्सी झाली़ लहान मुलगा सुदर्शन सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. सर्व मुलांना तिने उच्चशिक्षित बनविले़ परंतु नियतीने इंजिनिअर झालेल्या सूरजवर घाला घातला आणि दुसरा मोठा आघात माने कुटुंबावर झाला. मयत सूरज हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला होता. या दरम्यान त्याला काम नसल्याने एमपीएससी परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला व शेवटची अंतिम परीक्षा देणे राहिली होती.
संसारोपयोगी साहित्यापेक्षा पुस्तकांचे भांडार अधिक
- वैराग येथील माने यांच्या घरात संसारोपयोगी भांडी कमी, परंतु पुस्तकांचे मात्र भांडार आहे. कै. सुर्यकांत माने यांचे शिकवणी वर्ग चालत होते.विद्याथ्यार्ना अभ्यासासाठी लागणाºया नोटस्, क्रमिक पुस्तके, मराठी, इंग्रजी , हिन्दीमधील स्पर्धा परिक्षेची पुस्तके अशा विविध पुस्तकांनी पुर्ण घर भरले आहे. शिकवणी हॉलमधील फळ्यावर सुर्यकांत माने यांनी दोन वषार्पूर्वी शेवटच्या क्षणी लिहिलेला मजकुर आजही जपून ठेवलेला आहे.' शिक्षण हेच सर्वस्व , तेच जीवनाचे सार्थक माणून माने कुटुंबियांनी हा अनमोल ठेवा जपुन ठेवला असल्याचे त्यांचे नातेवाईक नेताजी घायतिडक यांनी सांगितले.