सावित्री पूल दुर्घटना :अपघातग्रस्त एसटीत आणखी सात प्रवासी?

By Admin | Published: August 9, 2016 04:33 AM2016-08-09T04:33:39+5:302016-08-09T04:33:39+5:30

महाडजवळचा ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला आता एक नवे वळण मिळाले आहे. या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसमधील कर्मचारी, प्रवाशांसह २२ जण वाहून गेल्याची नोंद झाली

Savitri bridge accident: seven more passengers injured in ST | सावित्री पूल दुर्घटना :अपघातग्रस्त एसटीत आणखी सात प्रवासी?

सावित्री पूल दुर्घटना :अपघातग्रस्त एसटीत आणखी सात प्रवासी?

googlenewsNext

मुंबई : महाडजवळचा ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला आता एक नवे वळण मिळाले आहे. या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसमधील कर्मचारी, प्रवाशांसह २२ जण वाहून गेल्याची नोंद झाली होती. मात्र स्थानिक जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाला दिलेल्या माहितीत आणखी सात प्रवासी त्यामध्ये असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे दोन एसटींमध्ये एकूण किती प्रवासी होते याचे गूढ वाढले आहे.
अपघातग्रस्त बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनमधील जीपीआरएस यंत्रणेद्वारे प्रवाशांची नोंद महामंडळाकडे त्वरित होते. अपघातापूर्वी वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनची ‘रेंज’ दोन तास गायब झाल्याने त्या काळात हे प्रवासी चढल्याचा अंदाज आहे.
रात्री साडेअकराच्या सुमारास रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. अपघातग्रस्त बसमधील दोन्ही वाहकांकडे तिकीट काढण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रॉनिक ट्रायमॅक्स मशीनचा आधार घेऊन प्रवाशांची ही माहिती देण्यात आली. मशीनमध्ये जीपीआरएस (ग्लोब पोस्ट रिपोर्टिंग सिस्टिम) यंत्रणा असल्याने तिकिट काढल्यास त्याची नोंद त्वरित एसटी मुख्यालय आणि स्थानिक आगारातील सर्व्हरमध्ये होते. वाहकांकडून मशीनद्वारे तिकिटे काढण्यात आल्याने २२ प्रवासी असल्याची नोंद मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र आणखी सात प्रवाशांनीही अपघातग्रस्त बसमधून प्रवास केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून एसटी महामंडळाला देण्यात आली आणि ही माहिती मिळताच एसटी प्रशासन अवाक झाले. या सातपैकी चार जणांचे मृतदेह मिळाले असून अन्य तीन जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. ते सर्व जण एसटीतूनच प्रवास करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. यासदंर्भात एसटीतील सूत्रांनी सांगितले की, याची संपूर्ण माहिती महामंडळाने घेतल्यानंतर चिपळूण ते खेड दरम्यान असलेल्या भोस्ते घाटामधून आणि खेड ते पोलादपूरमधील कशेडी घाटातून जाताना अपघातग्रस्त एसटीतील दोन्ही वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनची ‘रेंज’ गेली. महाड येईपर्यंत तब्बल दोन तास या मशीनला ‘रेंज’च नव्हती. त्यामुळे या दोन तासांत तिकिट काढून जरी प्रवासी बसले असतील तरी मशीनला ‘रेंज’नसल्याने त्या प्रवाशांची नोंद एसटीकडे असणाऱ्या सर्व्हरमध्ये झालेली नाही. चिपळूणमधील लोटे परशुराम हा ट्रायमॅक्स मशीनचा शेवटचा सिग्नल होता आणि त्यानंतर सिग्नल मिळालाच नसल्याने सर्व घोळ झाल्याचे सांगण्यात आले.
खेड ते भरणा नाका याप्रवासी बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे बसमधील वाहकांकडे असलेली मशिनही मिळालेली नसल्याने अनेक समस्या महामंडळासमोर निर्माण झाल्या आहेत.

...................
नुकसान भरपाई मिळणार कि नाही?
एसटी महामंडळाने नवी योजना सुरु करत एसटी अपघातांत प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे सात मृत प्रवाशांच्या नातेवाईकांकडून ते एसटीचेच प्रवासी असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते सिध्द करावे लागेल. तरच त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र ते सात प्रवासी एसटीचेच आहे का याचा शहानिशा महामंडळाकडून केला जात आहे. यात मोठी तांत्रिक अडचण उद्भवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Savitri bridge accident: seven more passengers injured in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.