सावित्रीच्या पुलाचे ४० बळी?
By admin | Published: August 4, 2016 05:42 AM2016-08-04T05:42:26+5:302016-08-04T05:42:26+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीने कोसळला.
जयंत धुळप/संदीप जाधव,
महाड- मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीने कोसळला. नदीच्या प्रवाहात दोन एसटी बसेससह १५हून अधिक वाहने वाहून गेल्याची, तर ४० हून अधिक प्रवाशांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेमुळे संपूर्ण कोकणात हाहाकार माजला असून एफडीआरएफ, सागरी तटरक्षक दल, नौदलासह पोलीस दलाकडून बेपत्ता प्रवाशांचे युद्धपातळीवरून शोधकार्य सुरू आहे. नौदलाची दोन हेलिकॉप्टर देखील वाहून गेलेली वाहने आणि त्यातील प्रवाशांचा दिवसभर शोध घेत होती. मात्र रात्री उशिरापर्यंत बसेस, खासगी वाहने वा प्रवासी यांच्यापैकी कोणाचाच शोध लागला नव्हता.
दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरीवली या दोन बसेस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या असून, दोन बसेसमध्ये चालक-वाहकांसह एकूण ३० ते ३५ प्रवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यात जयगड बसचे चालक एस. एस. कांबळी, वाहक विलास देसाई (चिपळूण) व राजापूर बसचे वाहक जी. एस. मुंढे, वाहक पी. बी. शिर्के (सर्व रा. चिपळूण) यांचा समावेश आहे. याशिवाय खासगी कार तसेच अन्य वाहनांचा अद्याप तपास लागलेला नाही.
>पूल दुर्घटनेची सखोल चौकशी करू - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेची सर्व स्तरावर सखोल चौकशी केली जाईल. एवढेच नव्हे तर राज्यभरात मुख्य मार्गावर असलेल्या सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून, त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारनंतर
घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाडचे आ. भरत गोगावले, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रशांत ठाकूर आदी नेते होते.
>पंतप्रधानांकडून चौकशी
या अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फ डणवीस यांच्याकडे त्याबाबत चौकशी केली. तसेच केंद्र सरकार हवी असलेली सर्व मदत करेल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. संसदेत हा विषय उपस्थित झाला असता, राजनाथ सिंग यांनीही केंद्र सरकारतर्फे शोध व मदतकार्यासाठी हवे ते सहकार्य करेल, असे सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही रेल्वेतर्फे मदतीचे आश्वासन दिले.
>शिवकृपा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य वाहने बचावली
नितीन माळी यांच्या मालकीचे शिवकृपा मोटर्स
हे टाटा शोरूम तसेच ट्रान्सपोर्ट कार्यालय व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानही या घटनास्थळाजवळच आहे. तेथील सूरजकुमार हा रात्री आपल्या नातेवाइकांशी मोबाइलवर बोलत असताना पुलासमोरच्या खिडकीत आला, त्याला पोलादपूरकडून येणारी वाहने व त्यांच्या हेडलाइट्स दिसत होत्या, मात्र काही क्षणांतच ही वाहने गायब होताना दिसत होती.त्याचवेळी त्याला मोठमोठे आवाज ऐकू येत होते. त्याने याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना जागे केले व महामार्गावरून पुलाकडे धाव घेतली. त्याचवेळी सावित्री पूल पूर्ण कोसळून खाली समोरून येणारी वाहने नदीत पडत असल्याचे लक्षात आले. सूरजकुमार आणि बसंतकुमार हे दोघे या पुलाच्या समांतर असलेल्या दुसऱ्या पुलावरून धावत गेले आणि महाडकडे येणारी वाहने थांबवली. त्यानंतर बसंतकुमार यांनी शिवकृपा मोटर्सचे व्यवस्थापक लाल गुप्ता यांना याबाबत फोनवरून माहिती दिली. गुप्ता यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस निरीक्षक नंदकुमार सस्ते यांना दुर्घटनेची माहिती कळवली. त्यानंतर सस्ते यांच्यासह डीवायएसपी प्रांजली सोनावणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कोसळलेल्या पुलाच्या दिशेने येणारी वाहने थांबवली.
>तिकीट मशिनचे नंबर ! : पूल कोसळल्यामुळे बेपत्ता झालेल्या जयगड- मुंबई
या गाडीचे वाहक विलास देसाई यांच्याकडे सीपीएन ०५१००, तर राजापूर - बोरीवलीचे वाहक प्रभाकर शिर्के यांच्याकडे सीपीएन ०५०८१ नंबरच्या तिकीट मशिन्स होत्या. या मशिन्स जीपीआरएस यंत्रणेला जोडलेल्या आहेत. जीपीआरएस ट्रॅकिंगची व्यवस्था मुंबई सेंट्रल येथे उपलब्ध आहे. त्यामुळे ट्रेमधल्या किती तिकीट फाटल्या, यावरून कोणत्या स्थानकावर किती प्रवासी चढले याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन बसेसमध्ये प्रत्येकी नऊ प्रवासी व चालक-वाहकांसह एकूण २२ जण होते, या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.