सावित्री पूल उद्घाटन सभेवर शेतकरी आंदोलनाचे सावट

By Admin | Published: June 6, 2017 02:40 AM2017-06-06T02:40:16+5:302017-06-06T02:40:16+5:30

सोमवारी दुपारी झालेल्या महाड येथील सावित्री पूल येथील उद्घाटन सभेदरम्यान सर्व प्रशासन शेतकरी आंदोलनाच्या भीतीने धास्तावलेले दिसून येत होते.

The Savitri Pool inaugurated the meeting of farmers' agitation | सावित्री पूल उद्घाटन सभेवर शेतकरी आंदोलनाचे सावट

सावित्री पूल उद्घाटन सभेवर शेतकरी आंदोलनाचे सावट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : सोमवारी दुपारी झालेल्या महाड येथील सावित्री पूल येथील उद्घाटन सभेदरम्यान सर्व प्रशासन शेतकरी आंदोलनाच्या भीतीने धास्तावलेले दिसून येत होते. सभा मंडपाच्या गेटवर मेटल डिटेक्टर आणि कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी लावल्यानंतरदेखील काळे कपडे, काळ्या बॅगा, शाई पेन, चुना आदी वस्तूंना बंदी घालण्यात आली होती. काळे कपडे परिधान करून आलेल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सभा मंडपापासून थेट बाहेर काढण्यात आले. तर सभामंडपात प्रवेश करणाऱ्या महिलांना स्वतंत्र कक्षात नेऊन तपासण्यात आले. सुरक्षेच्या या अतिरेकामुळे सभा मंडपात एक वेगळीच चर्चा सुरू होती.
सभा मंडपात प्रवेश करण्यासाठी महिला आणि पुरुषांना दोन वेगवेगळे प्रवेशद्वार बनवण्यात आले होते. या प्रवेशद्वारांवर पोलिसांचा ताफा तैनात करून प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्या जवळील सामानाला तीन ते चार वेळा तपासण्यात आले. तंबाखू, विडी, सिगारेट, माचिस अशा वस्तूंना निर्बंध मान्य आहे. मात्र, सभेत काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आलेल्या व्यक्तींना अचानकपणे सभागृहाच्या द्वारावर निर्बंध घालण्यात आले. कोणतीही चौकशी न करता काळे कपडे परिधान करून आलेल्या व्यक्तीला सभेत ड्युटीवर हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी थेट सभागृहाचा बाहेरचा रस्ता दाखवला. भाजपाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर काही व्यक्तींना प्रवेश देण्यात आला असला तरी सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर एखाद्या आरोपीप्रमाणे तिष्ठत उभे ठेवून नागरिकांची अवहेलना करण्यात आली. अशाच प्रकारे महिलांची प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आल्यानंतर प्रवेशद्वाराशेजारी उभारण्यात आलेल्या एका कापडी स्वतंत्र कक्षात नेऊन महिलांची पुन्हा वेगळी तपासणी करण्यात आली. तपासणीचा हा प्रकार अतिरेक्यासारखा असला तरी सभागृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे शाईचा पेन, पाण्याच्या बाटल्या आणि सोबत आणलेल्या छत्र्या तसेच छोटे-मोठे इतर सामान प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांनी बाहेरच काढून घेतले.
महाड पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील या सभेसाठी सक्तीने बोलविण्यात आलेले होते. आशा, अंगणवाडी सेविकांची गर्दी त्यांच्या युनिफार्ममुळे सभामंडपामध्ये वेगळीच दिसून येत होती.
प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांच्या नावाची नोंदणी व हजेरी घेण्याचे काम चालू होते. निवडणुकीच्या काळात राजकीय सभांना आमिष दाखवून गर्दी आणली जाते. ही प्रथा सर्वश्रुत आहे. असाच काहीसा प्रकार या सभेदरम्यान दिसून येत होता.
>संपामुळे कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त
मंत्री आणि मान्यवरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार बनवण्यात आले होते. या प्रवेशद्वारातून यादीवर असणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त कोणालाही सोडण्यात आले नाही. व्यासपीठ आणि सभा ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सुरक्षेसाठी बॅरिगेटिंग करून नंतर अतिमहत्त्वाचे व्यक्ती आणि पत्रकार कक्षाची उभारणी करण्यात आली होती.
सर्वात शेवटी सर्वसामान्य नागरिक तसेच राजकीय कार्यकर्त्यांकरिता आसनव्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेसाठी केलेल्या या उपाययोजना प्रचंड पोलीस बंदोबस्त हे सर्व तैनात असतानादेखील मुख्यमंत्र्यांच्या महाड येथील सभेत रायगड पोलिसांनी सुरक्षिततेचा अतिरेक केला.
सभा सुरू होण्यापूर्वी काळ्या रंगाचे कपडे, शाई पेन, आदीबाबत कोणतीही प्रसिद्धी देण्यात आली नव्हती. मात्र, सभास्थानी पोहोचल्यानंतर अचानक पोलिसांनी अशा नियमांची अंमलबजावणी करून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेल्या नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा हिरमोड केला.

Web Title: The Savitri Pool inaugurated the meeting of farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.