Savitribai Phule Birth Anniversary: क्रांतिसूर्य ज्योतिबाची सौभाग्यवती, तिने पेटविल्या ज्ञानज्योती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:36 PM2019-01-03T13:36:27+5:302019-01-03T13:38:42+5:30
आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला.
आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला.
ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्तव. महात्मा फुलेंना माहीत होते की, शिक्षणामुळेच माणूस गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्यातून जर आजच्या स्त्रीला तिचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर त्यासाठी तिमे शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षणामुळेच त्या अन्यायाशी प्रतिकार करण्यासाठी सक्षम होऊ शकतील, असा त्यांना विश्वास होता. पण त्यावेळी महिला आणि मुलींना शिकवण्यासाठी एका महिला शिक्षिकेची गरज होती. अशावेळी महात्मा फुलेंनी स्वतः सावित्रिबाईंना शिकविण्याची जबाबदारी घेतली.
लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती. आधी पती महात्मा फुलेंकडून शिकवण्या घेतल्यानंतर सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडीसोबतच इतर विषयांच्या परिक्षा दिल्या. सर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1848मध्ये त्यांनी भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. पुढे पती महात्मा फुलेंच्या साथीने सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा असाच सुरू ठेवला. पुढे महात्मा फुलेंनी जे समाजसुधारणेचे कार्य केले त्यामध्ये सावित्रीबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली. मग बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असो किंवा शेतकरी व शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली रात्रशाळा. काही सामजकंटकांनी त्यांना घरातून हाकलूनही लावले पण तरिदेखील न डगमगता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजकार्य थांबवले नाही. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या साथीने आपलं कार्य सुरूचं ठेवलं. त्या जे शिकल्या, अनुभवलं ते त्यांनी वेळोवेळी कवितेतून मांडूनदेखील ठेवलं.
एवढचं नव्हे तर या दाम्पत्याने जातिवादाविरोधातही बंड पुकारला होता. त्यांनी आपल्या घरातील स्वतःची विहिर सर्वांसाठी खुली करून दिली. महिला अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाईंनी विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. 1897मध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातलेलं असताना त्यांनी पुण्यामध्ये आपल्या मुलाला सोबतीला घेऊन एका हॉस्पिटलची स्थापना केली. तिथे त्यांनी समाजात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांवर उपचार केले. लोकांवर उपचार करत असतानाच स्वतः या रोगाच्या कचाट्याट सापडून सावित्रीबाईंचं निधन झालं.
खरं तर सावित्रीबाईंनी प्रसंगी शेणगोळे देखील खाल्ले. त्यामुळेच आजच्या मुली आणि महिला स्वतंत्रपणे वावरू शकत आहेत आणि शिक्षण घेऊ शकत आहेत, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. म्हणून प्रत्येक महिला ही त्या सावित्रीचीच लेक आहे जिने स्वतः खचता खाऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांचा उद्धार होण्यासाठी खुले करून दिले.