क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:09 PM2019-01-03T13:09:46+5:302019-01-03T13:11:06+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये. त्यांनी स्वत: शिकून महिलांना शिक्षणाचा हक्क दिला हे जरी त्यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य मानलं जातं असलं तरी त्यांनी कवियित्री म्हणूनही मोठं योगदान दिलं आहे.
सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ साली, तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला होता. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना दिसते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही कविता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?
...................................................
‘ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार)’
‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट)’
............................................................
‘ज्योतिबांचे बोल। मनात परसा
जीवाचा आरसा। पाहते मी
सेवेच्या भावाने। सेवा जे करती
धन्यता पावती। मानवात’
..........................................................
‘शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’
‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’
‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा
परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो, शिकण्यासाठी उठा’
.........................................................
‘शूद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती।
जन्मी या फेडती शूद्र सारे
विषम रचती समाजाची रीती
धूर्ताची ही नीती। अमानव...’ (मनू म्हणे)
‘दोन हजार वर्षांचे। शूद्रा दुखणे लागले
ब्रह्मविहित सेवेचे। भू - देवांनी पछाडले
(शूद्राचे दुखणे)’
......................................................
‘पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो
(पिवळा चाफा)’
‘फुल जाई
पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
(जाईचे फूल)’
....................................
‘पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या ढुंगणी झाप होते’ (पेशवाई)
.............................................