Savitribai Phule Birth Anniversary : सावित्रीबाईंनी पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा मोजतोय शेवटच्या घटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:44 PM2019-01-03T17:44:14+5:302019-01-03T17:46:08+5:30
सध्या हा वाडा मोडकळीस आला आहे. घाण आणि कचऱ्यामुळे वाड्यात पाय ठेवायलाही जागा नाही.
पुणे : आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात सर्वत्र साजरी केली जात आहे. मात्र त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली भिडेवाडा दयनीय अवस्थेत आहे. पुण्यात बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यामध्ये १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र सध्या हा वाडा मोडकळीस आला आहे. घाण आणि कचऱ्यामुळे वाड्यात पाय ठेवायलाही जागा नाही.
दगडूशेठ मंदिराच्या समोर असणाऱ्या या वाड्याकडे बाहेरून बघताना ही एक ऐतिहासिक वास्तू असेल असं कोणालाही वाटणार नाही. शहराच्या मध्यवस्तीत अमी गजबजलेल्या भागात असणारा हा वाडा कधीही पडेल अशी अवस्थेत आहे. या वास्तूचे जतन करण्यासाठी डागडुजी करावी असे राज्य सरकारचे महापालिकेला पत्र आहे. मात्र दुर्दैवाने सरकारी उदासीनतेचा फटका याही प्रक्रियेला बसला आहे. वाड्याच्या दुरुस्तीचा वाद न्यायालयात पोचल्याने महापालिका प्रशासन निदान जयंतीपुरताही वाडा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत नाही. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या भिडेवाड्याची दुरावस्था लज्जास्पद आहे. या वाड्यात सध्या धुळीचे लोट, जाळे-जळमटं यांनी व्यापलेला असून जाण्याला लक्षात येईल असा रस्ताही वाड्याला नाही.या वाड्याबाहेर सुरक्षारक्षक तर लांबचं पण साधे विजेचे दिवेही नाहीत.
याबाबत महात्मा फुले यांच्या पणतू सून नीता होले-फुले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या लोकमतला म्हणाल्या की, वाड्याचा वाद अनेक वर्षांपासून न्यायालयात सुरु आहे. मात्र सरकार काहीही पुढाकार घेण्यास तयार नाही. आघाडी सरकारने वाड्याच्या डागडुजीसाठी ५ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र त्याचा अजूनही उपयोग करण्यात आलेला नाही. वाड्याची सध्याची अवस्था महिला व फुले यांच्या वंशज म्हणून क्लेशदायक आहे. सरकारने याकरिता लवकरात लवकर या विरोधात पावले उचलण्याची गरज आहे.