सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशात सातवा क्रमांक, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत अव्वल; संशोधनात मात्र तळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:14 AM2017-09-07T01:14:20+5:302017-09-07T01:14:44+5:30
टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाºया संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.
पुणे : टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाºया संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे ते अव्वल ठरले आहे.
हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही. देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
‘टाइम्स’ या संस्थेकडून दर वर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. या वर्षी संस्थेने ७७ देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून मंगळवारी जागतिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत आॅक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर, २७ देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या २००मध्ये आहे.
मात्र, भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश पहिल्या अडीचशेमध्ये होऊ शकलेला नाही. एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ ४२ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या ३०० संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.
देशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संयुक्तपणे सातवा क्रमांक पटकावला असून पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. मागील वर्षी हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर होते. यंदा विद्यापीठाने कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाला मागे टाकले आहे.
जागतिक पातळीवर पुणे विद्यापीठ ६०१ ते ८०० या क्रमावारीत आहे. या क्रमवारीत देशातील एकूण ११ विद्यापीठांचा समावेश आहे. मागील वर्षीही याच क्रमवारीत विद्यापीठाला स्थान मिळाले होते.
यंदा विद्यापीठाला एकूण ३०.६ गुण मिळाले असून एकूण कामगिरीचा विचार करता विद्यापीठाच्या गुणांकनात यंदा काहीशी सुधारणा झाली आहे. आशियाई देशांमध्ये विद्यापीठ १६१ ते १७० या क्रमवारीत असून ब्रिक्स व विकसनशील देशांच्या यादीत १४३वे स्थान मिळाले आहे.पुणे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही पारंपरिक विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा जगातील पहिल्या एक हजार संस्थांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही.
संशोधनात तळाला
सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एकूण कामगिरीत देशात सातवा क्रमांक मिळविला असला, तरी संशोधनात मात्र हे विद्यापीठ तळाला गेले आहे. देशात संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ ४१व्या क्रमांकावर घसरले आहे. ‘टाइम्स’ने दिलेल्या गुणांकनामध्ये मागील दोन वर्षांत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. या वर्षी विद्यापीठाला केवळ ७.२ गुण मिळाले आहेत.
देशातील संस्थांची क्रमवारी
(कंसात टाइम्स क्रमवारी)
१ आयआयटी, मुंबई (३५१-४००)
२ आयआयटी, दिल्ली (५०१-६००)
३ आयआयटी, कानपूर
४ आयआयटी, खरगपूर
५ आयआयटी, रुरकी
६ इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, बंगळुरू (२५१-३००)
७ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (६०१ ते ८००)
अध्यापनात चौथ्या स्थानी
संशोधनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागे राहिले असले, तरी अध्यापनात मात्र विद्यापीठाने देशात चौथे स्थान मिळविले आहे. तर, पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात ते अव्वल ठरले आहे. अध्यापनात विद्यापीठाला ३८.९ गुण मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. आयआयएस (बंगळुरू), आयआयटी मुंबई व दिल्ली यापाठोपाठ विद्यापीठाचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगांशी सांगड या बाबतीतही विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे.