सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर
By admin | Published: September 23, 2016 02:40 AM2016-09-23T02:40:05+5:302016-09-23T02:40:05+5:30
देशातील पारंपरिक विदयापीठांच्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे.
पुणे : देशातील पारंपरिक विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे. टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने जाहीर केलेल्या रँकिंकमध्ये पुणे विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. देशातील सर्व आयआयटी आणि पारंपरिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.
टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेतर्फे जगभरातील विद्यापीठांसह भारतातील विद्यापीठांचे रॅकिंग केले जाते. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशभरातील पारंपरिक विद्यापीठांचे रँकिंग जाहीर करण्यात आले होते. त्यात प्रथम क्रमांकावर जाधवपूर विद्यापीठ आणि द्वितीय क्रमांकावर पंजाब विद्यापीठ होते. तर, तिसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होते. यंदा विद्यापीठाने तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने मार्च २०१६मध्ये १५० विविध मुद्द्यांवर माहिती मागवली होती. तसेच, जागातिक स्तरावरील नामांकित जर्नलमध्ये विद्यापीठामधील प्राध्यापकांचे रिसर्च पेपर आणि रिसर्च पेपरचा दर्जा यांचा आढावा टाइम्स हायर एज्युकेशनने घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ६०० ते ८००च्या दरम्यान आहे. विद्यापीठाची अध्यापन पद्धती, औद्योगिक कंपन्यांचे विद्यापीठाशी असणारे संबंध, विद्यार्थी व प्राध्यापकांचे संशोधनातील योगदान विचारात घेऊन विद्यापीठाचे रँकिंग निश्चित करण्यात आले आहे.