सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : अधिसभेत येणार शिक्षण शुल्कवाढीचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 08:11 PM2019-12-09T20:11:31+5:302019-12-09T20:14:16+5:30
महागाईच्या झळा सोसत असताना शुल्कवाढीचा बोजा पडल्यास सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात ३० टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २० टक्के वाढ करण्याबाबत अधिसभेत ठराव मांडण्यात आला आहे. या ठरावावर दि. १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेत चर्चा होणार आहे. आधीच महागाईच्या झळा सोसत असताना शुल्कवाढीचा बोजा पडल्यास सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
विद्यापीठाची अधिसभा दि. १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या अधिसभेची कार्यक्रमपत्रिका विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अधिसभा सदस्यांनी शुल्कवाढीसह विविध विषयांवर ठराव मांडण्यात आले आहेत. या सर्व ठरावांवर अधिसभेत चर्चा होऊन सदस्यांमध्ये एकमत झाल्यास त्याला मंजुरी मिळते. अधिसभा सदस्य डॉ. प्रकाश पाटील यांनी शुल्कवाढीचा ठराव मांडला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पर्यंत महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांची शिक्षण शुल्कामध्ये विद्यापीठ स्तरावर वाढ करून शुल्क निश्चित करावे. शुल्क निश्चित करण्यासंदर्भात विद्यापीठ स्तरावर कार्यप्रणाली मुदतीत पुर्ण होणार नसेल तर प्राथमिक स्वरूपात यामध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३० टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २० टक्के वाढ करावी, असे ठरावात नमुद करण्यात आले आहे. तसेच प्राचार्य डॉ. संजय खरात यांनीही शिक्षण शुल्क पुनर्रचित करण्याचा ठराव मांडला आहे.
याविषयी बोलताना पाटील म्हणाले, महाविद्यालयांना ६-७ वर्षापुर्वीपर्यंत दरवर्षी १० शुल्कवाढ करण्याचा अधिकार होता. पण त्यानंतर शुल्कवाढीवर बंधने घालण्यात आली. मागील काही वर्षात कर्मचारी, शिक्षकांचे वेतन वाढले आहे. महागाई सातत्याने वाढत आहे. विविध उपक्रमांसह महाविद्यालयांच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या खर्चामुळे महाविद्यालय चालविणे अवघड होते. शुल्कवाढीसंदर्भात विद्यापीठाने काहीच पावले उचलली नाहीत. महाविद्यालय स्तरावर वाढ केल्यास त्याला विरोध होतो. त्यामुळे विद्यापीठानेच शुल्कवाढीसाठी मान्यता द्यावी, यासाठी ठराव मांडण्यात आला आहे. याबाबत प्राचार्य फोरममध्येही चर्चा करण्यात आली असून सर्वजण सकारात्मक आहेत.
-------------
शुल्क प्रतिपुर्ती कमी मिळते
समाज कल्याण विभागाकडून देण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्ती अंतर्गत महाविद्यालयाला मिळणारे शिक्षण शुल्काची रक्कम कमी मिळते. त्यामुळे महाविद्यालयाला आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत विद्यापीठाने पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे ठरावही डॉ. संजय खरात यांंनी मांडला आहे. या ठरावासह शिक्षण शुल्कासंबंधी तीन ठराव असल्याने अधिसभेमध्ये हा मुद्या गाजण्याची शक्यता आहे.
--------------