सावित्रीच्या लेकींना एसटीची प्रतीक्षा
By admin | Published: October 18, 2016 01:29 AM2016-10-18T01:29:55+5:302016-10-18T01:29:55+5:30
एस.टी. बस वेळेवर येत नसल्याने सावित्रीच्या लेकींना बसस्थानकावर रात्री नऊपर्यंत अंधारातच थांबावे लागत आहे.
टाकवे बुदु्रक : आंदर मावळात तळेगाव दाभाडे-खांडी ही मुक्कामी एस.टी. बस वेळेवर येत नसल्याने सावित्रीच्या लेकींना बसस्थानकावर रात्री नऊपर्यंत अंधारातच थांबावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादा गैरप्रकार घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
आंदर मावळातील वहानगाव येथील भैरवनाथ महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा व महाविद्यालय दुपारी साडेचारला सुटते. त्यानंतर तब्बल चार ते पाच तास बसची प्रतीक्षा करावी लागते. (वार्ताहर)
>अंधारात बसची प्रतीक्षा
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विद्यालयात कुसवली, बोरवली, काब्रे, डाहुली, बेंदेवाडी, मोरमारवाडी, कुसुर खांडी, निळशी या गावातील मुले-मली शिक्षणासाठी वहानगावला येतात. बसस्थानकापासून वहानगाव हे दोन किलोमीटर अंतरावर असून, बसस्थानकाजवळ गर्द झाडी आहे. येथे उशिरापर्यत थांबणे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. गावापासून दूर असलेल्या बसस्थानकाजवळ विजेचीही सोय नाही. स्थानक परिसरात वन्य प्राण्यांचाही वावर असतो. येथून एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या ८०हून अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत बसची प्रतिक्षा करीत बसावे लागते.
>मिनी बसची मागणी
तळेगावातून शेवटची मिनीबस दुपारी साडेचारला वहानगाववरून परत जाते. ती बस आणखी १५ ते २० मिनिटे उशिराने पुढे खांडीपर्यंत सोडण्याची पालकांची मागणी आहे.