जगभरातील रसिक लुटणार ‘सवाई’चा आनंद !
By admin | Published: January 5, 2015 06:43 AM2015-01-05T06:43:29+5:302015-01-05T06:43:29+5:30
अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य प्रसारक मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता वेबकास्टिंगच्या माध्यमातून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पहिल्यांदाच जगभरातील रसिकांच्या दारी
पुणे : अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य प्रसारक मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता वेबकास्टिंगच्या माध्यमातून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पहिल्यांदाच जगभरातील रसिकांच्या दारी पोहोचणार आहे.
या महोत्सवातील कलावंतांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातून रसिक पुण्यात येत असतात़ त्याशिवाय हजारो रसिकांना केवळ अंतर आणि वेळ यामुळे पुण्यात येणे शक्य होत नाही़ अशा रसिकांना महोत्सवातील कलाविष्कारांचा आनंद घेता यावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात येत आहे़
मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी इंडियन मॅजिक आयचे संचालक हृषीकेश देशपांडे व राजेश देशमुख उपस्थित होते. वेबकास्टिंगची निर्मिती आणि एकूण व्यवस्थापन अमेरिकास्थित म्युझिक आॅन फायरसह इंडियन मॅजिक सांभाळत आहे.
६२व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील १५ तासांचे वेब कॅप्सूल हाय डेफिनेशन प्रकारात जगभरातील संगीतप्रेमी वेबकास्टिंगद्वारे पाहू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना ५० डॉलर मोजावे लागतील. महोत्सवातील कोणताही एखादा दिवस, कलावंताच्या पूर्ण सादरीकरणाचा आस्वाद घेण्याचाही पर्याय संगीतप्रेमींसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी दहा डॉलरपासून शुल्क आहे.
musiqui.com या वेबसाइटच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्येच वेबकास्टिंग केले जाईल. प्रख्यात पार्श्वगायक सोनू निगम यांचा कार्यक्रम प्रस्तुतकर्ता म्हणून सहभाग असणार आहे. उत्तर अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या ‘कलर्स’ टीव्ही चॅनेलने या वेबकास्टिंगचे सहा भागांच्या माध्यमातून प्रमोशन करण्याचे मान्य केले असल्याचे जोशी यांनी सांगितले़