राणेंची बदनामी करण्याचाच सावंत यांचा खटाटोप
By admin | Published: May 2, 2017 08:52 PM2017-05-02T20:52:35+5:302017-05-02T20:52:35+5:30
माजी आमदार विजय सावंत यांना साखर कारखाना सुरू करण्यापेक्षा राजकारणातच जास्त स्वारस्य आहे
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 2 - माजी आमदार विजय सावंत यांना साखर कारखाना सुरू करण्यापेक्षा राजकारणातच जास्त स्वारस्य आहे. साखर कारखान्याच्या आडून नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याचा त्यांचा खटाटोप आहे, अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची येथे केली.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सतीश सावंत म्हणाले, माजी आमदार विजय सावंत यांच्या साखर कारखान्याला वित्त पुरवठा करण्याबाबत झालेल्या चर्चेच्या वेळी आपण त्यांना राजकारण करणे कमी करा असा सल्ला दिला आहे. त्यांच्या साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यास जिल्हा बँक तयार आहे. त्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. या प्रस्तावा बरोबरच त्यांनी साधा अर्ज बँकेजवळ करावा. हा प्रस्ताव नाबार्ड आणि राज्य सहकारी बँकेकड़े पाठविला जाईल. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर साखर कारखान्याला कर्ज दिले जाईल.
त्यामुळे जिल्हा बँकेबद्दल सिंधुदुर्गवासीयांच्या मनात विजय सावंत यांनी संभ्रम निर्माण करू नये. आमदार नीतेश राणे यांनी सूचना केल्यानंतर आम्ही विजय सावंत यांच्या मागणीनुसार त्यांना कर्जाबाबत चर्चेसाठी वेळ दिली. तसेच त्यांना कर्जाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी प्रोजेक्ट रिपोर्टबाबत त्यांना विचारले असता तो अपूर्ण असून, पूर्ण करून देतो. असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. असे असताना पुन्हा प्रसिद्धी माध्यमांद्वारे सावंत जनतेची दिशाभूल करीत आहेत. साखर कारखान्याच्या आडून ते राजकारण करीत आहेत. त्यांनी हे राजकारण थांबविल्यास जनतेचे भले होऊ शकेल.
आतापर्यंत जिल्हा बँकेने साखर कारखाना उभारण्यासाठी कोणालाही स्वतःहून कर्जपुरवठा केलेला नाही. राज्य बँकेकडून आलेल्या प्रस्तावांवर विचार करून काही कारखान्यांना इतर सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.
माजी आमदार विजय सावंत यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी तारण ठेवण्यासाठी आवश्यक अशी "प्रॉपर्टी" आहे. तसेच रायगड सारख्या ठिकाणी जमीनही आहे. असे असताना त्यांना इतर बँकांनी कर्ज का दिले नाही ? 20 ते 25 वर्षे आमदारकी भोगणाऱ्या व्यक्तीला कर्ज मिळत नाही हे खरे नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा बँकेची व राणेंची बदनामी थांबवावी.
राणे व्हेंचर्स व राणे कुटुंबीयांबद्दलचा द्वेष संपवावा. कोणत्याही व्यक्तीला बँकेचे कर्ज घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचे खाते विजय सावंत यांच्या कंपनीचे जिल्हा बँकेत नाही. त्यामुळे त्यांना कर्ज देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना कर्ज हवे असेल तर पहिली ही बँकेची प्राथमिक अट त्यांनी पूर्ण करावी. त्यानंतर प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील बेरोजगार तरुण व ऊस उत्पादकांच्या भल्यासाठी सावंत यांनी बँकेच्या अटी, शतींचे पालन केल्यास निश्चितच कर्ज देऊ. कोणताही साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालायचा असेल तर त्याला साडेतीन लाख टन ऊस आवश्यक असतो. सावंत हा ऊस कुठून आणणार आहेत ? जिल्ह्यात ऊस उत्पादन वाढविण्यात विजय सावंत यांचे योगदान शून्य आहे.तसेच त्याबाबत त्यांचे नियोजनहि दिसून येत नाही. या उलट जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात सव्वा लाख टन ऊस उत्पपादन शेतकरी घेत आहेत. त्यामुळे स्वतः काहीही न करता सावंत हे फक्त साखर कारखाना उभा करण्याचा आभास निर्माण करीत आहेत हे सिध्द होते. असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी साखर कारखान्यात नोकरीसाठी 10 हजार तरुणानी विजय सावंत यांच्याकडे अर्ज सादर केले होते. मात्र हा साखर कारखाना सुरु होणार किंवा नाही याबाबत साशंकता असल्याने अनेक तरुणानी त्यांना निवडणुकीत मतदान केले नाही. त्यामुळे फक्त 4 हजार इतकी कमी मते सावंत यांना मिळाली असल्याचे सतीश सावंत यावेळी म्हणाले.