कधीकाळी होते खंदे समर्थक; आता केसरककरांनाच देणार आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:31 PM2019-08-01T14:31:09+5:302019-08-01T14:35:35+5:30
शिवसनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे.
मुंबई - राजकरणात कोण कधी कुठे जाईल याचा अंदाज बांधता येत नसतो. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या समोर असेच काही संकट उभे राहिले आहे. कधीकाळी केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असेलेले आणि सावंतवाडीचेनगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. साळगावकर हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर केसरकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. जर असे झाले तर, आगामी निवडणुकीत केसरकर यांच्यासमोर साळगावकरांचे आव्हान असणार आहे.
शिवसनेचे सावंतवाडीचेनगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. साळगावकर यांनी तीन वेळा सावंतवाडीचं नगराध्यक्षपद भूषवलं आहे. केसरकर यांचे खंदे समर्थक अशी त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख आहे. मात्र केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या साळगावकर यांनी मागील महिन्याभरात अनेकदा केसरकर यांच्यावर टीकेचे झोड उठवले. त्यामुळे केसरकर विरोधात साळगावकर असा वाद आणखीनच वाढला असल्याचे पहायला मिळत आहे.
त्यातच, केसरकरा आणि साळगावकर यांच्यातील वाद लक्षात घेत, राष्ट्रवादीने राजकीय खेळी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत केसरकरांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी देण्याची ऑफर साळगावकर यांना देण्यात आली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे साळगावकर हे सुद्धा याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात केसरकर यांच्या विरोधात साळगावकर विधानसभेच्या रिंगणात असले तर नवल वाटू नयेत.