‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार? - प्रवीण तोगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:11 AM2018-03-26T06:11:16+5:302018-03-26T06:11:16+5:30
गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय
नागपूर : गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सर्वच जण आपल्या ‘मन की बात’ करीत आहेत. रामजीच्या मनातील बात तर कुणी ऐका. भगवान राम यांना अयोध्येत राहण्यासाठी घर नाही. त्यांना घर कधी मिळेल, याचे उत्तर माझा ‘मोठा भाऊ ’अर्थात नरेंद्र मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले.
रामनवमीच्या पर्वाचे निमित्त साधत धंतोली येथील विहिंप कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना डॉ. तोगडिया म्हणाले, राम मंदिराबाबत १९८४ पासून प्रकरण सुरू आहे. सद्यस्थितीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारले जाईल, असे सरकार सांगत आहे. असे आहे तर राम मंदिराच्या मुद्यावर आंदोलन का उभारण्यात आले. लाखो कार सेवक एकत्र आले, हजारोंना तुरुंगात जावे लागले. शेकडोंनी बलिदान दिले. मात्र, २०१४ मध्ये सत्ता सांभाळताच राम मंदिरला विसरले.
१९७२ पासून आपले मोदींशी व्यक्तिगत संबंध आहेत. आपले त्यांच्या घरी जाणे येणे होते. मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेऊ शकतात, तर माझी का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.
रोजगार, शिक्षण, कर्जमाफीत सरकार अपयशी
केंद्र सरकार २० कोटी युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी व चार लाख काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यात अपयशी ठरल्याची टीका तोगडिया यांनी केली. शेतकºयांचा कापूस, डाळींच्या भावात ३० टक्क्यांहून घसरण झाली, असेही ते म्हणाले.