बोले तो ये हैं अस्सल मुन्नाभाई !
By admin | Published: December 22, 2014 03:27 AM2014-12-22T03:27:58+5:302014-12-22T03:27:58+5:30
चोरी, लूटमार, प्रसंगी जीवघेणा हल्ला केलेला तरुण विविध १९ खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतो. आणि त्यानंतर इतरांना गांधीवादाचे धडे देतो.
चेतन ननावरे, मुंबई
चोरी, लूटमार, प्रसंगी जीवघेणा हल्ला केलेला तरुण विविध १९ खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतो. आणि त्यानंतर इतरांना गांधीवादाचे धडे देतो. त्याचे नाव आहे लक्ष्मण गोळे. सद्भावना संघाच्या गांधी परीक्षेमुळे या वाल्याचे वाल्मिकीमध्ये रूपांतर झाले. सध्या हा लक्ष्मण मुन्नाभाईप्रमाणे कैद्यांच्या पुनर्वसनाचे काम करीत आहे.
घाटकोपरमध्ये जन्माला आलेला लक्ष्मण तुकाराम गोळे हा नांदेडच्या बोर्डिंगमध्ये शिकायला होता. १९९१ साली आठवीचे शिक्षण मधेच सोडून लक्ष्मणने बोर्डिंगमधून पळ काढला. १९९१ साली एका वादात वयाच्या १६ व्या वर्षी त्याच्या हातून एक गंभीर गुन्हा घडला. एकावर लक्ष्मणने वस्तऱ्याने वार केले. पोलिसांनी लक्ष्मणला अटक करताना त्याच्या वयाची नोंद १८ वर्षे केली. परिणामी त्याची रवानगी बाल सुधारगृहाऐवजी थेट आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली.
तुरुंगात गेलेल्या लक्ष्मणला ३ हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. मात्र तुरुंगवास भोगून आलेल्या लक्ष्मणपासून शाळेतील मित्र दुरावले होते. मग त्याला साथ मिळाली ती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संगतीची. पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तब्बल १९ गुन्ह्यांसंदर्भात त्याला पोलिसांनी अटक केली होती.
२००७ साली तुरुंगात असताना लक्ष्मणचा संबंध आला तो सद्भावना संघाशी. संघामार्फत कैद्यांना महात्मा गांधींच्या अहिंसा धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी गांधी परीक्षेचे आयोजन करण्यात येत होते. या सर्व गोष्टी ऐकलेल्या लक्ष्मणने टाइमपास म्हणून गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक वाचण्यासाठी मागितले. ११ व्रतांपैकी नेमक्या कोणत्या व्रताचा प्रयोग स्वत:वर करायचा, असे म्हणत लक्ष्मणने नेहमी खरे बोलण्याचा संकल्प केला. २००७ साली लक्ष्मणची केस कोर्टात उभी राहिली. कोर्टाबाहेर त्याच्या साथीदारांनी पंच आणि साक्षीदारांना धमकावून लक्ष्मणच्या सुटकेची तयारी केली होती. मात्र लक्ष्मणने त्यांना या क्षेत्रात येण्यास नकार देत स्वत:चे गुन्हे कबूल केले.