फॉर्म्युला सांगा, वाट पाहू; प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:45 AM2024-01-02T10:45:36+5:302024-01-02T10:46:21+5:30
आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे सांगितले.
मुंबई : ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असून, १२ जागांवर लढण्याचा फॉर्म्युला त्यांनी आघाडीला दिला आहे. आमचा फॉर्म्युला मान्य नसेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण तुमचा फॉर्म्युला काय ते तरी सांगा? असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे सांगितले.
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच राज्यात दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर आहे. महाविकास आघाडीने या काळात ४० वेळा बैठका घेतल्या. एवढ्या बैठका होऊनही जेव्हा ४८ जागांचे वाटप होत नाही, त्यावेळी वेगळ्या चर्चांना उधाण येते. मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील; या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व भाजपची सरळ-सरळ लढत होणार असल्याचे दिसते. असे असले तरी आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाही हवी आहे. त्यामुळे भाजपला हरवणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.
...तर शिवसेना-वंचित फिफ्टी-फिफ्टी लढू
आघाडीबाबत आमचे शिवसेनेशी बोलणे झाले आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत युती झाली नाही, तर आम्ही दोघेच फिफ्टी-फिफ्टी लढणार आहोत. २४ जागा ते लढतील. २४ जागा आम्ही लढू. त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचे अंडरस्टँडिंग काय हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यांनाच विचारा, असेही ते म्हणाले.
‘वंचित’ला सोबत घेतले पाहिजे: अशोक चव्हाण
इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेतले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे; परंतु जागा किती द्याव्या लागतील, त्यांची इच्छा काय आहे, या सर्व गोष्टी चर्चेअंती स्पष्ट झाल्यानंतरच हा विषय सोडविला जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. सोमवारी नांदेडमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राजकीय पक्ष दावे करतातच
शिवसेनेने २३ जागांची मागणी केली आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय पक्ष जिंकतील वा हारतील हा त्यांचा निर्णय आहे. असे असेल तर भाजपने निवडणुका लढवू नये आम्हीच लढू, अशी काही भूमिका घेणार आहात का?, असा टोला त्यांनी लगावला.