सावरकरांना प्रतिगामी म्हणणे, हिंदुत्वाची वैचारिक हत्याच
By admin | Published: February 28, 2016 01:46 AM2016-02-28T01:46:07+5:302016-02-28T01:46:07+5:30
हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी प्रतिगामी म्हणून कायमच हिणविले असून, पुरोगामी विचारवंतांकडून ही एक प्रकारे वैचारिक हत्त्याच
नाशिक : हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी प्रतिगामी म्हणून कायमच हिणविले असून, पुरोगामी विचारवंतांकडून ही एक प्रकारे वैचारिक हत्त्याच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषराव मोरे यांनी केले.
येथील शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात शंकराचार्य न्यासच्या वतीने ‘पुरोगामी दहशतवाद’ या विषयावर डॉ. मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुरोगामी विचारवंताकडून हल्ली हिंदुत्व आणि स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना प्रतिगामी ही भयानक शिवी दिली जात आहे. बुरसटलेल्या विचारांचा, जातीयवादी, रुढी-परंपरा माननारा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा अशा वैचारिकतेच्या शिव्यांचे प्रतिबिंब म्हणून पुरोगाम्यांकडून ‘प्रतिगामी’ हा शब्द दिला गेला आहे. प्रतिगामी समजणे म्हणजे ही एक प्रकारे वैचारिक हत्त्या आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी केंद्रे ही त्याचे मूळ आहेत. देशातील सर्वच मोठ्या विद्यापीठावर कार्यरत असलेले कुलगुरू हे पुरोगामी विचारांचे आहेत. कोणी जर हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शोधनिबंध तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शोधनिबंध नाकारला जात आहे. पुरोगामी विचारांच्या सहाय्यानेच शोधनिंबध लिहिला तर तो मान्य केला जातो, हे दुर्दैवी आहे. यावेळी डॉ. शेषराव मोरे यांनी नांदेड येथील त्यांच्या एका विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाचे उदाहरण दिले.
सावरकरांइतका बुद्धिवाद आजच्या एकाही बुद्धिवाद्यात नाही. तसेच ‘वन मॅन वन वोट’ ही संकल्पना सर्वात आधी मानणारे सावरकरच होते. सावरकरांना हिंदू धर्माची नव्हे तर हिंदूंची चिंता होती. कारण त्यावेळी कॉँग्रेसचे अध्यक्ष असलेले मौलाना आझादांनी मुस्लिमांना लोकसंख्येच्या ५० टक्के आरक्षण मागितले होते, असेही मोरे म्हणाले. (प्रतिनिधी)