एससी आरक्षणास फटका?
By admin | Published: August 2, 2016 01:58 AM2016-08-02T01:58:01+5:302016-08-02T01:58:01+5:30
अनुसूचित जातीच्या आरक्षणनुसार ग्रामपंचायतीच्या वॉर्डमध्ये आरक्षण असतानाही २०११च्या जनगणनेनुसार अनेक गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य ते पन्नासपर्यंत गणली आहे.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात २००१च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणनुसार ग्रामपंचायतीच्या वॉर्डमध्ये आरक्षण असतानाही २०११च्या जनगणनेनुसार अनेक गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य ते पन्नासपर्यंत गणली आहे. त्यामुळे या संवर्गातील नागरिकांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. निवडणुकीसाठी प्रभाग, गट, गण आदीमध्ये आरक्षण निघणे अशक्य होणार आहे. त्यामुळे जनगणना यादीत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येबाबत योग्य ती सुधारणा करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्याकडे निवेदनात केली आहे.
२००१च्या जनगणनेनुसार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या आरक्षणाने निवडून आलेले सदस्य आहेत. मात्र, सदर गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य ते पन्नास अशी गणना केली आहे. २००१च्या जनगणनेनुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीत अनुसूचित जातींच्या सदस्यांना आरक्षण दिले आहे. पण सन २०११ च्या जनगणना यादीत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत वास्तवाशी मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. बौद्ध व नवबौद्ध लोकसंख्येची जनगणना अनुसूचित जातीत न करता सर्वसाधारण लोकसंख्येत गणली गेल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार बौद्ध व नवबौद्ध यांचा अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत समावेश करून घ्यावा. २०११च्या जनगणनेनुसार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभागरचनेत अनुसूचित जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण निघणे अशक्य झाले आहे. २०११ च्या जनगणना यादीमुळे अनुसूचित जातींवर अन्याय झाला आहे. योजनाच्या अनुदानापासून सदर समाज वंचित राहणार आहे. मिळणारे अनुदान कमी प्रमाणात आल्याने दलित वस्त्या विकासापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे २०११च्या जनगणनेतील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येतील तफावत त्वरित दुरुस्त
करण्याची मागणी निवेदनाद्वारे
केली आहे. (वार्ताहर)
>सुधारणा करणार : तहसीलदारांचे आश्वासन
तहसीलदार पाटील व गटविकास अधिकारी काळे यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाध्यक्ष रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत ओव्हाळ, दत्ता यादव, रमेश ओव्हाळ, दिनेश शिंदे, विजय कांबळे, महेंद्र ओव्हाळ यांनी निवेदन दिले. त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तहसीलदार शरद पाटील म्हणाले, सन २०११ ची जनगणना यादी पूर्वी तयार झाली असून, त्यात तफावत असल्यास स्थानिक कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागवून, सर्व्हे करून अनुसूचित जाती लोकसंख्या सुधारणा केली जाईल.
तालुक्यात १०४ ग्रामपंचायतींत १८४ महसुली गावे, तळेगाव दाभाडे व लोणावळा नगर परिषदांचा समावेश आहे. लोकसंख्या एकूण ३,७७,५५९ असून, ग्रामीण २,१९,७८४, तर शहरी १,५७,७७५ अशी आहे. तालुक्यात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या ३६,३२५ आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या १९,७८२ आहे. त्यात पुरुष १०,१४८ महिला ९,६३४ आहेत. शहरी भागातील अनुसूचित जातीची लोकसंख्या १६,५४३ असून, त्यात पुरुष ८,३५१, महिला ८,१९२ आहे.