घोटाळा ४०० नव्हे, चार हजार कोटींचा
By admin | Published: May 17, 2017 01:49 AM2017-05-17T01:49:42+5:302017-05-17T01:49:42+5:30
गेल्यावर्षी राज्यात झालेल्या तुरीच्या उत्पादनाच्या सरकारी माहितीमध्ये तब्बल १० लाख टनांची तफावत आहे. तूर साठेबाजीत सत्ताधाऱ्यांचाच संबंध असण्याचा संशय आहे
- लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : गेल्यावर्षी राज्यात झालेल्या तुरीच्या उत्पादनाच्या सरकारी माहितीमध्ये तब्बल १० लाख टनांची तफावत आहे. तूर साठेबाजीत सत्ताधाऱ्यांचाच संबंध असण्याचा संशय आहे. त्यात चारशे कोटींचा घोटाळा असल्याचे मुख्यमंत्री म्हणत असले, तरी हा घोटाळा चार हजार कोटींचा आहे. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडून करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील (गिजवणेकर) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त चव्हाण येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. गतवर्षी ११ लाख ७१ हजार टन तुरीचे उत्पादन झाल्याची माहिती सरकारने १७ मार्च २०१७ रोजी विधानसभेत दिली. त्यानंतर २५ एप्रिल २०१७ रोजी २० लाख ५० हजार टन तुरीचे उत्पादन झाल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच हा गलथानपणा करण्यात आला आहे. अवघ्या पाच आठवड्यांत उत्पन्नाची आकडेवारी फिरवणारे हे कसले सरकार? असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. आघाडी सरकारच्या काळात डाळींची साठाबंदी करण्यास बंदी घातली होती. ‘युती’ने ती बंदी गेल्यावर्षी उठवली, त्यामुळेच ‘तुरी’चा घोटाळा झाला, अशी टिपणीही त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्याठिकाणी कर्जमाफी दिली. उत्तरप्रदेशपेक्षाही महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे. मुख्यमंत्र्यांना आपली मागणी तत्त्वत: मान्य असूनही ते निर्णय घ्यायला तयार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.
‘महाड’मधून संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा ‘महाड’ येथून उद्या (बुधवारी) सुरू होईल. तेथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
भाजपाकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केले जात आहे. कोणत्यातरी प्रकरणात अडकवून दहशत माजविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. त्याविरोधात आता संघटित लढाई लढावी लागेल.
- आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री