हा तर शब्दांचा घोटाळा - पंकजा मुंडे
By admin | Published: July 2, 2015 04:09 AM2015-07-02T04:09:25+5:302015-07-02T04:09:25+5:30
चिक्की व इतर साहित्य खरेदीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटात कुठलाही घोटाळा झालेला नाही. तो माझ्या बदनामीसाठी राजकीय हेतूने उभा करण्यात आलेला आहे, अशा शब्दांत
मुंबई : चिक्की व इतर साहित्य खरेदीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटात कुठलाही घोटाळा झालेला नाही. तो माझ्या बदनामीसाठी राजकीय हेतूने उभा करण्यात आलेला आहे, अशा शब्दांत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या चिक्की व इतर साहित्य खरेदीत २0६ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आले होते. लंडनहून परत आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे त्यांनी खंडन केले. पूर्वीच्या शासनाने जे दरकरार ज्या संस्थांसाठी आरक्षित करून ठेवले होते, त्या संस्थांना खरेदी आदेश देण्यात आले आहेत. चिक्कीची पहिल्यांदाच खरेदी करण्यात आलेली नसून, यापूर्वीही अशी खरेदी झालेली आहे. चिक्कीचा दर्जा चांगला असल्याचा अहवाल आमच्याकडे आहे. गेल्या काही दिवसांत चिक्कीच्या दर्जाबद्दल माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत, त्याबद्दल माहिती घेऊन सत्यता आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल.
खरेदीचा निर्णय जलदगतीने झाल्याचे पंकजा यांनी कबूल केले. मात्र केंद्र सरकारकडून आलेला अतिरिक्त निधी वाया जाऊ नये, या प्रामाणिक भावनेतून तसे केल्याचे तसेच वॉटर फिल्टरच्या खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटदार रत्नाकर गुट्टे यांना जालन्यात केवळ आपल्या जवळचे असल्याने जलयुक्त शिवार योजनेचे काम दिल्याचा आरोप मंगळवारी करण्यात झाला होता. या आरोपाचे खंडन करताना गुट्टे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या किती जवळचे आहेत, हे सांगण्यासाठी पंकजा मुंडे गुट्टेंची शरद पवारांसोबतची काही छायाचित्रेही दाखविली. अंगणवाड्यांना मेडिसिन किट खरेदीसाठी केलेल्या खरेदीचेही त्यांनी समर्थन केले. एकदा मान्य केलेल्या निविदेत मोडतोड करता येत नाही, असे असताना या खरेदीत ती का केली, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, आपल्या विभागाकडे जी मर्यादा होती त्यात बसविण्यासाठी तसे करण्यात आले.
ज्यांची राजकारणात विश्वासार्हता नाही, त्यांनी केलेल्या आरोपावर मला काहीही बोलावयाचे नाही, असेही त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता सांगितले.
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सहयोगी पक्षाचे आ. महादेव जानकर, बहीण खा. प्रीतम मुंडे, आ. माधुरी मिसाळ आणि विभागाच्या सचिव व आयुक्तांसह ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तरे दिली.
२०६ कोटींच्या खरेदी व्यवहारावर आरोप झाल्यानंतर एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली होती; मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर ज्या पद्धतीने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील धावून आले होते, ती परिस्थिती मात्र पाहावयास मिळाली नाही. मंगळवारी विनोद तावडे यांच्यावरील आरोपाला तावडे यांच्यापेक्षा मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे दोघे मंत्री माध्यम प्रतिनिधींना उत्तरे देत होते; मात्र पंकजा मुंडे यांना स्वत:चा बचाव स्वत:लाच करावा लागला.
मुंडे यांची पत्रकार परिषद राज्यातील भाजपामध्ये कशा पद्धतीचे गटबाजीचे राजकारण सुरू आहे, त्याचे एक चांगले उदाहरण होते.
-------------
मी एक रुपयाचाही अपहार केलेला नाही. उलट केंद्र शासनाने पोषण आहारासाठीच्या रकमेत जी एक रुपयाची वाढ केली, त्यातून मिळालेल्या अतिरिक्त रकमेपैकी ४२ कोटी रुपये लाभार्थ्यांना अंडी व केळी देण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे सोपविण्याचा निर्णय आम्ही घेतला. चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून, गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यास सर्व पदांचा राजीनामा देऊ. - पंकजा मुंडे