विद्यार्थिनीच्या आत्महत्येवरून विधानसभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 04:30 AM2016-07-23T04:30:54+5:302016-07-23T04:30:54+5:30
विद्यार्थिनीने इयत्ता अकरावीमधील तिचा प्रवेश रद्द झाल्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.
मुंबई : कळंबोलीतील पुष्पा सूर्यवंशी या विद्यार्थिनीने इयत्ता अकरावीमधील तिचा प्रवेश रद्द झाल्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. शिवसेनेच्या आक्रमक सदस्यांनी गदारोळ केल्यानंतर कामकाज एकदा तहकूब करण्यात आले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही सेनेला त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले.
शून्य तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पुष्पाकडून सुधागड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन स्कूलने आॅफलाइन अर्ज भरून घेतला होता आणि तिच्याकडून २० हजार रुपये घेतले होते, असा आरोप प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी केला आणि कारवाईची मागणी केली. आॅफलाइनचे आमिष दाखवून दिशाभूल केली जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. आक्रमक झालेले शिवसेनेचे सदस्य वेलमध्ये उतरले. काँग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांना साथ दिली. कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.
शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले की, सुधागड संस्थेवर कारवाई केली जाईल. आॅफलाइन प्रवेश दिलाच जाणार नसेल तर त्याचे समर्थन करून आपण कोणीही करता कामा नये. विधिमंडळातील भूमिकेचा संदेश समाजामध्ये जातो याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे तावडे म्हणाले. पुष्पा सूर्यवंशीला दहावीमध्ये ८१.४० टक्के गुण मिळाले होते.
(विशेष प्रतिनिधी)