एमआयडीसीमध्ये भंगार माफियांचा धुमाकूळ
By admin | Published: October 31, 2016 02:39 AM2016-10-31T02:39:09+5:302016-10-31T02:39:09+5:30
ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार माफियांनी धुमाकुळ घातला आहे.
नामदेव मोरे,
नवी मुंबई- ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार माफियांनी धुमाकुळ घातला आहे. दिवाळीदिवशी पहाटे बोनसरीमध्ये बांधकाम साहित्य उचलून नेले. नागरिकांनी अडविल्यानंतर आम्ही सैदुल्लाची माणसे आहोत तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही. एक ठिकाणी चोरी केली आता दुसऱ्या ठिकाणी करायला चाललो आहोत असे खुले आव्हाण दिले. नागरिकांनी पोलिसांना कळविताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.
बोनसरी गावाजवळ भुखंड क्रमांक डी १३ / ५ येथे वेअर हाऊसचे बांधकाम सुरू आहे. रविवारी पहाटे येतील लोखंडी सळया व इतर साहित्य चोरट्यांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य उचलून बाजूच्या ओढ्यातून ते बोनसरी गावच्या चौकात आणून ठेवले जात होते. तेथून टेंपोमधून ते इतर ठिकाणी पोहचविले जात होते. रात्री दोन वाजता येथील रहिवासी ट्रक घेवून घरी आला होता. वाहनांचीही चोरी होत असल्याने तो ट्रकमध्येच झोपला होता. तिन वाजेपासून चोरट्यांनी बांधकाम साहित्य घेवून जाण्यास सुरवात करताच त्याने परिसरातील नागरिकांना याविषयी माहीती दिली. नागरिकांनी चोरट्यांना जावून जाब विचारण्याचा
प्रयत्न केला. परंतु आम्ही सैदुल्लाची माणसे आहोत. येथून
बांधकाम साहित्य पळवून नेत असून आता दुसऱ्या ठिकाणी जातोय तुम्हाला काय करायचे आहे असा प्रश्न उपस्थित केला.
नागरिकांनी चोरट्यांचे फोटो काढण्यास सुरवात केल्यानंतर त्यांनी न घाबरता बिनधास्त फोटो काढा, आम्हाला कोणी काहीही करू शकत नाही असे उद्धट बोलण्यास सुरवात केली. रहिवाशांनी पोलिस स्टेशनमध्ये फोन केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला.
औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्यांमधील लोखंड, पत्रे व इतर साहित्य चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या या परिसरात सक्रिय आहेत. काही भंगार चोरांच्या टोळ्यांमध्ये महिलांचाही सहभाग आहे. टेंपो व इतर वाहने घेवून बिनधास्तपणे भंगार चोरून घेवून जात आहेत. बंद कंपन्यांमधील भंगारामधून लाखो रूपयांची कमाई होत आहे.
एमआयडीसीमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा भंगार चोरी होत असल्याचे निदर्शनास येते पण चोरट्यांच्या हातामधील लोखंड गज व इतर शस्त्रांमुळे त्यांना अडविण्याचे धाडस कोणालाच होत नाही. चोरट्यांचा धुमाकुळ वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री घराबाहेर पडण्याचीही भिती वाटत आहे. मध्यरात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत घेवून एमआयडीसीमधून प्रवास करावा लागत आहे. बोनसरी व इतर अनेक ठिकाणी रोडवर उभ्या केलेल्या वाहनांमधील टेप, टायर व इतर साहित्याचीही चोरी होवू लागली आहे. भंगार माफियांचा उपद्रव थांबविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. रबाळेमध्ये यापुर्वी भंगार माफियांनी हवालदार गोपाळ सैंदाणे यांची हत्या केली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पोलीस चौकीची मागणी
बोनसरी गाव परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी या परिसरामध्ये गांजा विक्री होत असल्याचेही निदर्शनास आले होते. वाहनांमधील टेप व इतर साहित्य चोरण्याचे गुन्हेही होत असतात. या सर्व घटनांमुळे रात्री ११ नंतर येथील नागरिकांना बाहरे जाण्याची भिती वाटत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथे बिट चौकी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
चोरट्यांचे फोटोसेशन
भंगार चोरी करणाऱ्यांना नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी न भिता आम्ही एक ठिकाणचे साहित्य चोरले आता दुसरीकडे जातोय असे उत्तर दिले. नागरिकांनी मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी न घाबरला बिनधास्त फोटो काढा, आम्हाला कोणी काही करू शकत नाही असे स्पष्ट केले.
साहित्याची चोरी
रविवारी पहाटे चोरी झालेल्या वेअर हाऊसच्या साईटवर यापुर्वीही चोरी झाली होती. औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. कुठेही बांधकाम सुरू झाले की चोरटे रात्री बांधकामासाठीचे लोखंड, पत्रे, सिमेंटची चोरी करत आहेत. सुरक्षा रक्षकांनी अडविल्यास त्यांना शस्त्राचा धाक दाखविला जातो. भितीमुळे अनेकवेळा उद्योजक तक्रारही करत नाहीत.