मुंबई महापालिकेत घोटाळा; मुख्यमंत्र्यांची कबुली!
By Admin | Published: April 12, 2016 03:32 AM2016-04-12T03:32:59+5:302016-04-12T03:32:59+5:30
मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्तेदुरुस्तीत घोटाळे झाल्याची कबुली देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला सोमवारी अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
मुंबई : मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्तेदुरुस्तीत घोटाळे झाल्याची कबुली देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला सोमवारी अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या टॅबच्या खरेदीत मात्र कोणताही घोटाळा नसल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले.
मुंबई आणि कोकणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कंत्राटाची चौकशी केली असता त्यात अनियमितता आढळल्या. एकच काम वारंवार करणे, एकच फेरी करून जास्त फेऱ्या केल्याचे दाखविणे, जादाचा गाळ काढल्याचे दाखविणे असे प्रकार घडल्याचे ते म्हणाले. रस्ते दुरुस्तीच्या कामातही अनियमितता झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे, असे त्यांनी सांगितले.
नालेसफाईतील अनियमितता तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार या कामात ३८ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणी १३ कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी सेवेतून निलंबित केले आहे.
त्याचप्रमाणे ३२ कंत्राटदारांपैकी २४ नालेसफाई कंत्राटदार तर ८ वजनकाटा ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून तुरु ंगात पाठविण्यात आले असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
डम्पिंग नव्हे, ‘कचरा प्रक्रिया भूमी’ म्हणू
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत
तळोजा येथे ३८ हेक्टर
जागेवर तर ऐरोली येथे ३२.७७ हेक्टर जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कचऱ्याचे डम्पिंग केले जाणार नाही, तर या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रि या करणारे प्रकल्प उभारले जाणार असून, ही कचरा प्रक्रिया भूमी म्हणून ओळखली जाईल.
देवनार डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारला जाईल आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंड शास्रोक्त पद्धतीने २०१७पर्यंत बंद केले जाईल, असे त्यांनी सांगितले.