दुर्मीळ मांडुळांची तस्करी
By Admin | Published: March 23, 2017 02:51 AM2017-03-23T02:51:04+5:302017-03-23T02:51:04+5:30
काळ्या जादूसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या दोन दुर्मीळ मांडुळांची लाखो रुपयांमध्ये तस्करी
ठाणे : काळ्या जादूसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या दोन दुर्मीळ मांडुळांची लाखो रुपयांमध्ये तस्करी करणाऱ्या संदीप पंडित (२१) आणि अनंता घोडविंदे (४७) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक किलो वजन असलेले २५ लाखांचे आणि एक किलो ९०० ग्रॅम वजन असलेले ३० लाखांचे अशी दोन दुर्मीळ प्रजातीचे मांडूळ सर्प हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी पाचपाखाडीतील सेवा रस्त्यावर दोघे जण दोन जिवंत मांडूळाची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. तेव्हा, २१ मार्च रोजी रात्री ८.३० वा.च्या सुमारास सेवा रस्त्यावरील पदपथावर पंडित आणि घोडविंदे (रा. दोघेही कल्याण) या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेतून हे ५५ लाखांचे मांडूळ पोलिसांनी हस्तगत केले. (प्रतिनिधी)