स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:58 AM2017-02-27T00:58:01+5:302017-02-27T00:58:01+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप परीक्षा रविवारी घेण्यात आली.
सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप परीक्षा रविवारी घेण्यात आली. नीरेतील परीक्षा केंद्रात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले.
नीरेतील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी स्कॉलरशीप परीक्षा घेण्यात आली. इयत्ता ५वी च्या मराठी व सेमी इंग्रजी या दोन माध्यामातून परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका आल्या होत्या. नीरा केंद्रात १२१ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर, प्रश्नपत्रिकांचे गट्टे फोडले असता मराठी माध्यमातील २२, तर सेमीइंग्रजी माध्यमातील ४६ प्रश्नपत्रिका कमी आल्याचे आढळले. ऐनवेळी प्रश्नपत्रिका कमी पडल्याने केंद्रप्रमुखांसह शिक्षकांचा गोंधळ उडाला. प्रश्नपत्रिका न दिल्याने विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागली. नीरा केंद्राचे प्रमुख आर. टी. कदम यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही वेळासाठी थांबवली. कमी आलेल्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून, १ वाजता प्रश्नपत्रिका वाटून परीक्षा सुरु केली. यामुळे विद्यार्थ्याची गैरसोय झाली. वर्षभर तयारी करून हुशार व कष्टाळू विद्यार्थी अशा परीक्षांसाठी बसत असतात. नीरा परिसरातील दूरच्या अंतरावरुन विद्यार्थी या केंद्रावर परीक्षेसाठी येतात. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा मोठा दबाव असतो. दीड तासाची परीक्षा असल्याने जेवणाचे डबे मुलांनी सोबत आणले नव्हते. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती ढासळलेली होती. ११ वाजताच्या पेपरसाठी मुले सकाळी १०.३० वाजताच केंद्रावर आली होती. या निष्काळजीपणाबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला. नीरेतील लिलावती शहा कन्या शाळेतही परीक्षा केंद्र होते. या ठिकाणी मात्र परीक्षा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्रप्रमुख शुभांगी पंडित यांनी दिली. (वार्ताहर)
>पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी राजसाहेब लोंढे यांनी सांगितले की, परीक्षा परिषदेकडून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोचवल्या जातात. रविवारी परीक्षा परिषदेकडून नजरचुकीने पाकिटात कमी प्रश्नपत्रिका टाकल्या गेल्या. केंद्रप्रमुखांनी तत्काळ प्रश्नपत्रिका कमी आल्याचे कळविले. त्यांना तातडीने प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून परीक्षा उशिरा का होईना पण पूर्ववत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळ देण्यात आला आहे. फक्त दीड तासाने उशिरा सुरू करण्यात आली. ही सर्वस्वी चूक परीक्षा परिषदेची आहे.