राज्यात क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा
By admin | Published: January 22, 2015 12:49 AM2015-01-22T00:49:29+5:302015-01-22T00:55:54+5:30
बालरुग्णांसाठी आवश्यक असलेली पीसी-१३ आणि पीसी १४ औषधांसाठी धावाधाव.
सचिन राऊत/ अकोला - क्षयरोग या गंभीर आजाराची लागण असलेल्या बालरुग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या पीसी-१३ आणि पीसी १४ या दोन नमुन्यांच्या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण कमी करून क्षयरोगाचा निपटारा करण्यासाठी राज्य शासनाकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र योग्य त्या औषधांची कमी असल्याने या कार्यक्रमाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णांना औषधी देताना त्यांचे वजन आधी करण्यात येते. क्षयरुग्णांची वजन गटानुसार तपासणी करून त्यांना औषधी देण्यात येतात. यामध्ये ६ ते १0 किलो वजन गटाच्या बालकांना प्रोडक्ट कोड (पीसी) क्रमांक १३ आणि ११ ते १७ किलो वजन असलेल्या बालरुग्णांना प्रोडक्ट कोड (पीसी) क्रमांक १४ देण्यात येतो. क्षयरोग असलेल्या बालरुग्णांना पहिल्या डोसमध्ये २४ गोळय़ा असलेल्या औषधांचे पाकीट देण्यात येते. यामधील एका पाकीटमध्ये ४ गोळय़ा असतात. या गोळय़ा बालरुग्णांना एक दिवस आड देण्यात येतात. पहिला डोस पूर्ण झाल्यानंतर तपासणी करून दुसर्या टप्प्यात ३ गोळय़ांचा समावेश असलेल्या १८ गोळय़ांचे पाकीट रुग्णांना देण्यात येते. या १८ गोळय़ांचे पाकीट रुग्णांना दर दिवसाआड देण्यात येतात. या औषधांचे डोस पूर्ण झाल्यानंतर बालरुग्णांना टॉनिकची गोळी देण्यात येते. क्षयरोग असलेल्या बालरुग्णांसाठीच्या या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाल्याने बालरुग्णांना औषधांसाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, या औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा, अशी मागणी बालरुग्णांनी केली आहे.
क्षयरोगाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या गोळय़ांची काही प्रमाणात कमतरता असली तरी रुग्णांना या गोळय़ा उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुबंई स्थित औषध निर्माण अधिकारी एस. जानुनकर यांनी स्पष्ट केले.
*खासगी दवाखाने, औषध दुकानांमध्ये गोळय़ाच नाहीत क्षयरोग असलेल्या बालरुग्णांना देण्यात येत असलेल्या गोळय़ांचा डोस खासगी रुग्णालय किंवा औषध दुकानांमध्ये मिळत नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. या औषधी शासकीय रुग्णालयांमध्येच मिळत असल्याने रुग्णांना दुसरा पर्याय नाही. या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने बालरुग्णांना मोठय़ा अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे.