वृक्षलागवडीसाठी जिल्ह्यात रोपांचा तुटवडा!
By admin | Published: June 29, 2016 01:08 AM2016-06-29T01:08:29+5:302016-06-29T01:08:29+5:30
शासनाने केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रजिस्टर झालेल्या खड्ड्यांपेक्षा अधिक रोपांची मागणी
खोडद : शासनाने केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रजिस्टर झालेल्या खड्ड्यांपेक्षा अधिक रोपांची मागणी झाल्याने आता रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या-ज्या ग्रामपंचायतींची आर्थिक क्षमता उत्तम आहे किंवा वृक्षारोपण कार्यात सहभागी होणाऱ्या विविध संस्थांनी स्वखर्चाने वृक्षलागवडीसाठी रोपे उपलब्ध करावीत, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विवेक कुलकर्णी यांनी केले आहे.
शासनाच्या या संकल्पपूर्तीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात १,४०७ ग्रामपंचायती आहेत. १६ लाख २७ हजार रोपांचे उद्दिष्ट आहे. २२ लाख विविध रोपे उपलब्ध आहेत. यात चिंच, वड, करंज, पिंपळ, आवळा, कडूनिंब, काजू, जांभूळ, आंबा व इतर जंगली प्रजाती तसेच फळझाडांची लागवड केली जाणार आहे. २६ जूनपर्यंत २२ लाख खड्ड्यांचे उद्दिष्ट संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल आहे. जिल्ह्यात एकूण ३२ रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यात आली असून कृषी विभाग, महापालिका, नगर परिषदा व खासगी रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विवेक कुलकर्णी हे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
झाडांच्या संवर्धनासाठी आवश्यक तेथे कुंपण करणे, त्यांचे संरक्षण करणे, नागरिकांचे प्रबोधन करणे या उपक्रमासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागांमार्फत ३० हजार मनुष्यबळ वापरले जाणार आहे. यात विद्यार्थी, नागरिक, संस्था, पदाधिकारी यांचा सहभाग असेल. वृक्षारोपण करताना वृक्षारोपणाबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन प्रात्यक्षिक करून दाखविले जाईल. विविध संस्था, संघटना व नागरिकांच्या माध्यमातून आतापर्यंत २० लाख खड्ड्यांचे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. वन विभागामार्फत १२ लाख २७ हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत, तर वन विभागामार्फत जिल्ह्यातील १२ तालुक्यांत ७० ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. (वार्ताहर)
अचानक मागणी वाढल्याने रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनी स्वखर्चाने रोपे उपलब्ध करावीत.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात दीड ते दोन लाख रोपांची मागणी आहे.
पुरंदर तालुक्यात ५५ हजार, बारामती तालुक्यात ६३ हजार, मुळशी तालुक्यात ४५ हजार, मावळ तालुक्यात २७ हजार रोपांची उपलब्धता स्वयंस्फूर्तीने करण्यात आली आहे.
१ लाख रोपे विनामूल्य
पुण्यातील रघुनाथ ढोले यांनी थेऊर येथील देवराई नावाच्या स्वत:च्या रोपवाटिकेतून या उपक्रमासाठी १ लाख रोपे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. अहमदनगर जिल्ह्यासाठी २० हजार, नाशिक २० हजार, पुणे ग्रामीणसाठी २० हजार आणि पुणे शहरासाठी ४० हजार रोपांचे वितरण केले आहे. केवळ पर्यावरण आणि निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आपण हे स्वयंस्फूर्तीने केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.