बिबट्याची दहशत वाढली
By admin | Published: November 5, 2016 01:13 AM2016-11-05T01:13:42+5:302016-11-05T01:13:42+5:30
पाणलोट क्षेत्रातील कांदलगाव परिसरात दोन दिवसांत चार शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याची दहशत वाढू लागली आहे.
इंदापूर : पाणलोट क्षेत्रातील कांदलगाव परिसरात दोन दिवसांत चार शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याची दहशत वाढू लागली आहे. आज सकाळी इंदापूरच्या वनपालांनी कांदलगावला भेट देऊन, परिसराची पाहणी केली. दुपारी पिंजरा मागवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पिंजरा लावण्यात येईल.
दोन दिवसांपासून कांदलगाव परिसरात बिबट्या दिसत असल्याची चर्चा आहे. परवा दिवशी बिबट्याने एका शेळीचा बळी घेतला. कालपासून आणखी तीन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. रात्रीच्या वेळेस शेळ्यांवर हल्ले होत आहेत. रात्री उसाला पाणी देताना बिबट्या नजरेस पडत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शेळ्यांनंतर तो माणसांवरही हल्ला करेल, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
आज सकाळी नऊ वाजता इंदापूरचे वनपाल पी. डी. चौधरी, वनरक्षक एस.व्ही. बागल, वनमजूर डी. पी. काळेल, एम. जी. बुनगे यांनी कांदलगावास भेट दिली. सर्व
परिसर पिंजून काढला. काही ठिकाणी पावलांचे ठसे मिळाले. हे ठसे बिबट्याच्या पावलांशी मिळतेजुळते होते. लोकांशी चर्चा करताना
त्यांनी बिबट्याच पाहिल्याचे ठामपणे सांगितले.