निसर्गरम्य रेल्वे स्थानक दुरवस्थेत
By admin | Published: May 30, 2016 01:55 AM2016-05-30T01:55:36+5:302016-05-30T01:55:36+5:30
येथील रेल्वे स्टेशन हे आजूबाजूच्या ७० गावांचे दळणवळणाचे प्रमुख ठिकाण आहे.
कामशेत : येथील रेल्वे स्टेशन हे आजूबाजूच्या ७० गावांचे दळणवळणाचे प्रमुख ठिकाण आहे. येथून रोज हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करीत असतात. स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, मूलभूत सोई सुविधांची दयनीय अवस्था असल्याची तक्रार प्रवासी करतात.
स्थानिक व आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना पुणे व मुंबईकडील प्रवासासाठी कामशेत रेल्वे स्टेशन जवळचे आहे. पण, स्टेशनवर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा नसल्याच्या तक्रारी होत आहेत. फलाटावर दोन शौचालये असून, त्यातील एक अत्यंत अस्वच्छ व मोडकळीस आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुसरे शौचालय बांधले असून ते कित्येक महिने ते कुलूपबंदच आहे. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही, अशी टीका प्रवासी करीत आहेत. नवीन बंद शौचालयाच्या दरवाजावरच प्रवासी लघुशंका करीत असल्याने फलाट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्टेशनवर महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव आहे.
प्रवाशांसाठीच्या विश्रामगृहात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. मोकाट जनावरांच्या विष्ठेने या परिसरात दुर्गंधी पसरली असून, विश्रामगृहाचा वापर कोणीही प्रवासी करीत नाही. दोन्ही फलाटांवरील निवाराशेड खूप लहान असल्याने अनेक प्रवाशांना उन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागते. काही प्रवासी रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर बसणे पसंत करतात. पण त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. विशेष करून महिलांना याचा जास्त त्रास होतो. रोज हजारो नागरिक येथून प्रवास करतात. तरी रेल्वे स्टेशनवर एकच तिकीट खिडकी आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांग लागते व त्यात अनेक प्रवाशांची गाडी चुकते.
स्टेशनच्या बाजूने दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहते. शेजारी नदी असलेले कामशेत हे बहुधा जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असेल. मावळ परिसरात अनेक पर्यटनस्थळे असून प्राचीन मंदिरे, गड किल्ले, बौद्धकालीन लेण्या, धरणे आदी आहेत. तिथे जाण्यासाठी पुणे-मुंबई परिसरातील पर्यटकांना कामशेत रेल्वे स्टेशन सोईचे असल्याने अनेक पर्यटक येथे येतात.
रेल्वे प्रशासनाने या रेल्वे स्टेशनचा कायापालट करून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी रेल्वे प्रवासी संघटना, पर्यटक व शहरातील जागृत नागरिकांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)
>दुरून डोंगर साजरे : प्रवाशांची नाराजी
‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या दूरदर्शनच्या मूळ गाण्यात ‘माझ्या तुमच्या जुळल्या तारा...’ या ओळीसाठी कामशेत रेल्वे स्टेशन व नदीचे दृष्य चित्रित केले आहे. या स्टेशनचे नयनरम्य दृष्य दुरून पाहणे खूप आनंददायी ठरते. मात्र, दुरून डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे या निसर्गरम्य कामशेत रेल्वे स्टेशनमध्ये सोई सुविधांची वानवा असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.